राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:55+5:302021-02-05T04:38:55+5:30
जलालखेडा : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांचे अभूतपूर्व कार्य आहे. त्यामुळे त्यांना मरणाेपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करून ...
जलालखेडा : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांचे अभूतपूर्व कार्य आहे. त्यामुळे त्यांना मरणाेपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करून त्यांचा गाैरव करण्यात यावा, अशी मागणी भाेयर पवार युवक आघाडीच्या नरखेड तालुक्यातील रामठी, आरंभी व हिवरमठ शाखेच्या वतीने तहसीलदार डी. जी. जाधव यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महान क्रांतिकारी संत होते. त्यांनी सन १९४२ मध्ये त्यांच्या क्रांतिकारी भजनांच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती करीत विदर्भातील चिमूर (जिल्हा चंद्रपूर), आष्टी (जिल्हा वर्धा), यावली व बेनोडा (जिल्हा अमरावती) या गावांमध्ये ऐतिहासिक क्रांती घडवून आणली. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी नागपूर व रायपूर येथे सामुदायिक ध्यान, प्रार्थना, रामधून, ग्रामसफाई सुरू करून जनतेला जागृत करण्याचे काम केले. अफाट साहित्य लेखन करून नवा समाज व राष्ट्र निर्मितीसाठीही कार्य केले. त्यांचा ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ गावाच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली ठरला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना मरणाेपरांत भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, असेही निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिष्टमंडळात अखिल भारतीय भोयर पवार महासंघ प्रणीत युवक आघाडीचे रामठीचे शाखा अध्यक्ष शुभम खवसे, होमेश्वर खवसे, मुकुंदा पठाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश हाेता.