राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:25 AM2020-12-13T04:25:08+5:302020-12-13T04:25:08+5:30
नागपूर : एसटीचे बहुतांश कर्मचारी थेट प्रवाशांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना कोरोनाची लस देण्याची मागणी एसटी ...
नागपूर : एसटीचे बहुतांश कर्मचारी थेट प्रवाशांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना कोरोनाची लस देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
एसटी महामंडळात राज्यात एकूण ९८ हजाराच्या जवळपास कर्मचारी आहेत. यातील १५ हजार कार्यालयीन कर्मचारी वगळता जवळपास ७३ हजार कर्मचारी थेट प्रवाशांच्या संपर्कात येतात. यात चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे कर्मचारी दिवसभरात हजारो प्रवाशांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना कोरोनाची लस प्राधान्यक्रमाने देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेने केली आहे. एसटी महामंडळात सध्या ४०७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ३,१३० कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर ९७ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या आणि प्रवाशांच्या थेट संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देणे अत्यावश्यक
‘कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर एसटीचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून प्रवाशांना सेवा देत आहेत. परराज्यातील प्रवाशांना एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोनाची लस देण्याची गरज आहे.’
-संदीप शिंदे, राज्य अध्यक्ष, एसटी कामगार संघटना
..............