खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोविड लस द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:08 AM2021-02-12T04:08:50+5:302021-02-12T04:08:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना काळात दिवस-रात्र रुग्णांची सेवा करणारे खासगी रुग्णालयातील डॉक्टर तसेच इतर आरोग्य कर्मचारी आजही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना काळात दिवस-रात्र रुग्णांची सेवा करणारे खासगी रुग्णालयातील डॉक्टर तसेच इतर आरोग्य कर्मचारी आजही कोविड-१९ च्या लसीपसून वंचित आहेत. त्यांना तात्काळ कोविडची लस देण्यात यावी, अशी मागणी शहरातील विविध मेडिकल संघटनांनी केली आहे. गुरुवारी मनपा वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासोबत मेडिकल संघटनांच्या शिष्टमंडळाने याबाबत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांना दिले.
शिष्टमंडळात संघटन संयोजक वैद्यकीय आघाडीचे डॉ. गिरीश चरडे, आयुर्वेद व्यावसायिक संघटना, भाजपा औषधी विक्रेते आघाडी, राष्ट्रीय एकात्मिक वैद्यकीय संघटना (निमा), पॅरामेडिकल संघटना, मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह, होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया, सोहम फाऊंडेशन आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते.
नागपूर शहरात कोरोनापासून जवळपास ५० हजार सरकारी आणि खासगी डॉक्टर नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, औषध विक्रेता हे सुद्धा सेवा देत आहेत. यांनासुद्धा लवकरात लवकर कोविडची लस मिळणे गरजेचे आहे. शहरात आतापर्यंत १७ हजार आरोग्य कर्मच्याऱ्यांना लस देण्यात आली आहे. कोविड लसीसाठी ३९ हजार लोकांनी नोंदणी केली आहे. या उर्वरित नोंदणी केलेल्या लोकांना कॉल अथवा संदेश पोहोचवून लस देण्यात यावी. तसेच ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविन ॲपवर नोंदणी केली नाही मात्र त्यांना लस घ्यायची आहे अशा लोकांची माहिती गोळा करून त्यांना लस देण्यात यावी, अशी मागणी वीरेंद्र कुकरेजा यांनी केली आहे.