पीक विमा योजनेची शेतकऱ्यांना पावती द्या, कृपाल तुमाने यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:06 AM2018-03-07T11:06:44+5:302018-03-07T11:06:53+5:30
शेतकरी पिकांचा विमा काढतात, मात्र त्यांना विमा योजनेबाबतची पावती दिली जात नाही. याकडे लक्ष देता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती द्यावी, याबाबत रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकरी पिकांचा विमा काढतात, मात्र त्यांना विमा योजनेबाबतची पावती दिली जात नाही. त्यामुळे त्यांना केव्हापर्यंत मुदत आहे, यासोबत विविध अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती द्यावी, याबाबत रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खा. तुमाने यांनी नियम ३७७ अन्वये सदर मुद्दा उपस्थित केला. पीक विमा योजनेंतर्गत शेतकरी हे शासनाने नियुक्त केलेली बँक, कंपनीकडून पिकांचा विमा करतात. शेतकऱ्यांकडून विम्याचे पैसेसुद्धा घेतले जाते; परंतु असे असताना त्यांना पावती दिली जात नाही. त्यामुळे विमा कालावधी पूर्ण झाला की नाही, हेसुद्धा शेतकऱ्यांना माहीत होत नाही. दुसरीकडे विमा संपल्यानंतर पुन्हा विमा कधी काढायचा, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती असते.
अशात पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही.
शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी पैसे खर्च केल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती देणे गरजेचे आहे. याकडे शासनाने लक्ष देता पावती देण्यासंदर्भात पाऊल उचलावे, अशी मागणी करीत विमा योजनेची मुदत संपल्यानंतर नूतनीकरणासाठी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असे मत तुमाने यांनी व्यक्त केले.