राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 09:04 PM2018-07-16T21:04:41+5:302018-07-16T21:05:48+5:30

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा या गावात भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या नाथजोगी समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नाथजोगी, नाथपंथी, डवरी गोसावी, भराडी समाजाच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

Give death penalty to the accused in Rainpada massacre | राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या

राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या

googlenewsNext
ठळक मुद्देनाथजोगी समाजाचा हल्लाबोल मोर्चा : हातात काळे झेंडे घेऊन शासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा या गावात भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या नाथजोगी समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नाथजोगी, नाथपंथी, डवरी गोसावी, भराडी समाजाच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
यशवंत स्टेडियम येथून नाथजोगी समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा विधानभवनाकडे जात असताना मॉरिस टी पॉईंट येथे पोलिसांनी हा मोर्चा अडविला. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चात सहभागी हजारो नाथजोगी बांधवांनी जोरदार नारेबाजी करीत आपल्या मागण्या रेटून धरल्या. ‘आरोपीला फाशी झालीच पाहिजे,’, ‘समाजाला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘भटक्याला न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला. धुळे हत्याकांड निषेध असे लिहिलेले काळे झेंडे हातात घेऊन नाथजोगी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. समाजातील नागरिकांना भटकंतीमुळे १९६१ चा वास्तव्याचा पुरावा मिळत नसल्यामुळे जातीचे दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्रे मिळत नाहीत. समाजाकडे स्थायी स्वरुपाचा उद्योग, पक्की घरे, शेती नसून भटकंतीमुळे मुलांचे शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाच्या हितासाठी शासनाने कॅम्पद्वारे जातीचे दाखले देण्याची मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली. दरम्यान शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत यांनी मोर्चाला भेट देऊन आपले समर्थन दिले. मोर्चातील अनिल रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्यारेलाल शिंदे, रवींद्र चव्हाण, शेगर महाराज, भाऊलाल बाबर यांच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. तर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी मोर्चास्थळी भेट देऊन नाथजोगी समाजाच्या मागण्यांवर कारवाईचे करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा मोर्चा मागे घेण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व अनिल रमेश शिंदे,  प्यारेलाल शिंदे, रवींद्र चव्हाण, शेगर महाराज, भाऊलाल बाबर आदींनी केले.
हत्याकांडातील मृतांच्या पीडित कुटबियांना २० लाखाची मदत त्वरित मिळाली पाहिजे, कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी व कुटुंबाचे पुर्नवसन झाले पाहिजे, राईनपाडा ग्रामपंचायत इमारतीच्या ठिकाणी हत्याकांडातील मृतांचे स्मारक उभारावे, नागपूरच्या कळमना येथील बांधवांना जलदगती न्यायालयाद्वारे न्याय देऊन त्यांचे पुर्नवसन करावे, जात दाखल्यासाठी १९६१ च्या वास्तव्याच्या पुराव्याची जाचक अट रद्द करावी, नाथजोगी समाजाला फिरस्तीचे प्रमाणपत्र द्यावे आदी मागण्याही या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

Web Title: Give death penalty to the accused in Rainpada massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.