गरजेनुसारच कर्जमाफी द्या
By admin | Published: September 25, 2015 03:38 AM2015-09-25T03:38:58+5:302015-09-25T03:38:58+5:30
राज्यातील दुष्काळग्रस्त व नुकसानग्रस्त जिल्ह्यातील त्या-त्या भागातील परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना गरज असेल तेथेच कर्जमाफी देण्यात यावी.
शरद पवार : शेतकऱ्यांना मानसिक आधाराची गरज
नागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त व नुकसानग्रस्त जिल्ह्यातील त्या-त्या भागातील परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना गरज असेल तेथेच कर्जमाफी देण्यात यावी. परंतु सरसकट कर्जमाफीची गरज नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघ व टिळक पत्रकार भवन ट्रस्टतर्फे आयोजित मिट द प्रेस कार्यक्रमात पवार यांनी शेतकरी आत्महत्यासह विविध मुद्यावर पत्रकारांशी चर्चा केली. मागील काही वर्षाच्या आकडेवारीचा विचार करता जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत शेतकरी प्रामुख्याने आत्महत्या करतात. यामागे नापिकी, कर्जबाजारीपणा व भांडवलाचा अभाव आदी कारणे आहेत. आत्महत्येची समस्या विदर्भ व मराठवाड्यातच नाही तर ९४ टक्के सिंचन सुविधा असलेल्या पंजाब, आंध्रप्रदेश व कर्नाटक आदी राज्यातही आहे. किल्लारी भूकंपाच्यावेळी लोकांना या धक्क्यातून सावरण्यासाठी मानसिक आधार देण्यासाठी डॉ. मोहन आगाशे यांची मदत घेतली होती.
त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना मानसिक आधाराची गरज आहे. आत्महत्या मागील कारणांचा तज्ज्ञांच्या माध्यमातून शोध घेण्याची गरज आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी निकष आहे.
परंतु अनेक प्रकरणात शेतकऱ्याच्या नावावर जमीन नसते. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मदतीसाठी पात्र धरले जात नसल्याने निकषात सुधारणा करणाची गरज आहे. ६० वर्षापूर्वी देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. आज ती १२५ कोटीवर गेली आहे. शेतीखालील जमीन मात्र कमी झाली आहे. असे असतानाही ६० टक्के लोक शेतीवर निर्भर आहे. जमिनीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे.
शेतीवर कुटुंबातील सदस्यांचा वाढलेला अतिरिक्त भार कमी करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल देशमुख, जिल्हा (ग्रामीण) चे अध्यक्ष रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये, अतुल लोंढे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सिंचन घोटाळ््याची चौकशी न्यायपूर्ण नाही
राज्यातील सिंचन घोटाळ्यासंदर्भात राज्य सरकारमार्फ त सुरू असलेली चौकशी न्यायपूर्ण नाही. अशा प्रकारच्या मार्गाचा यापूर्वी कधी वापर केला नाही. दिल्लीत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनाच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. असे असतानाही माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप लावण्यात आल्याचे त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
शेतकरी आत्महत्या व दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता त्यांना मदत मिळावी. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. यासाठी पंतप्रधानांची वेळ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.