हप्ता द्या...धंदा करा

By admin | Published: July 14, 2017 02:35 AM2017-07-14T02:35:53+5:302017-07-14T02:35:53+5:30

हुक्का पार्लर चालवा. पहाटेपर्यंत हॉटेल चालवा. त्यात बिनधास्त दारूही पिण्याघेण्याचे चालू द्या. हप्ता देत असाल तर

Give it up ... Make a business | हप्ता द्या...धंदा करा

हप्ता द्या...धंदा करा

Next

हॉटेल, हुक्का पार्लर सुरू : चहा टपरीवाल्याच्या
पोटावर लाथ : सीताबर्डी पोलिसांचा फंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुक्का पार्लर चालवा. पहाटेपर्यंत हॉटेल चालवा. त्यात बिनधास्त दारूही पिण्याघेण्याचे चालू द्या. हप्ता देत असाल तर रस्त्यावर कुठेही वाहन उभे करा, पोलीस ठाण्याच्या गेटसमोरून अवैध प्रवासी वाहतूकही करू शकता. कोणत्याही ठिकाणी हातठेला उभा करून तुम्ही कोणताही व्यवसाय-धंदा करू शकता. त्याचा कुणाला त्रास होत असेल तर पर्वा नाही. मात्र, त्यासाठी तुम्ही हप्ता द्यायला हवा. हप्ता देत नसाल तर मग तुम्ही कोणत्या कानाकोपऱ्यात बसूनही काही विकू शकत नाही. होय, सीताबर्डीतील हे वास्तव आहे. हप्ता देत असलेल्यांच्या डोक्यावर हात ठेवणाऱ्या सीताबर्डी पोलिसांनी हप्ता न देणाऱ्याच्या पोटावर लाथ मारण्याचा निर्दयीपणा चालवला आहे. या निर्दयीपणाचे पाप ते वरिष्ठांच्या माथ्यावर मारत आहेत.

शहरातील मध्यवर्ती आणि महत्त्वाची बाजारपेठ म्हणून सीताबर्डीची ओळख आहे. टाचणीपासून खेळणीपर्यंत आणि तबल्यापासून गिटारपर्यंत प्रत्येक वस्तू, खाण्यापिण्याचे जिन्नस, कपडे, ज्वेलरी आणि सौंदर्य प्रसाधनांसह मानवी गरजा भागविणारी प्रत्येक चीजवस्तू सीताबर्डीत मिळते. त्यामुळे उपराजधानीच्या अन्य बाजारपेठेच्या तुलनेत सीताबर्डीतील बाजारपेठेत वर्षभर मोठी गर्दी असते. लहान-मोठ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंतची सारखी वर्दळ असल्यामुळे या बाजाराच्या परिसरात रस्त्याच्या आजूबाजूला अनेक हातठेलेवाले खाण्यापिण्याच्या चीजवस्तू विकतात अन् आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. या भागातील मॉल, विविध कार्यालयाच्या आजूबाजूला कोपऱ्यात जागा धरून काही चहाटपरीवालेही आपली रोजीरोटी कमवितात. सकाळपासून रात्रीपर्यंत राबराब राबून या मंडळींना महत्प्रयासाने आपल्या कुटुंबीयांच्या गरजा भागविण्यापुरते पैसे कसेबसे मिळवता येते. अशा या हातठेलेवाल्यांकडून हप्ता मिळत नाही म्हणून सीताबर्डीपोलिसांनी त्यांच्या पोटावर लाथा मारण्याचे प्रयत्न चालविले आहे. एकीकडे कोणत्याही ठिकाणी दुकान थाटून वाहतुकीला अडसर निर्माण करणाऱ्यांच्या दुकानदाऱ्या बिनबोभाट सुरू आहेत. दुसरीकडे समाजस्वास्थ्य बिघडवून तरुणाईला वाममार्गाला लावणारे हुक्का पार्लरही बिनधास्त सुरू आहेत. गुन्हेगारीला प्रोत्साहन देऊ पाहणारे हॉटेल्स पहाटेपर्यंत चालविले जातात. त्यात खुल्या बारसारखी दारू विकली-पिली जाते.
या सर्वांकडे पोलीस लक्ष द्यायला तयार नाहीत. कारण तेथून पोलिसांना मोठी देण मिळते. स्वत:च्या कुटुंबीयांचे पोटच मोठ्या मुश्किलीने भरू पाहणाऱ्या हातठेलेवाल्यांवर, रस्त्याच्या कडेला छोटेसे दुकान थाटणाऱ्यांवर पोलीस मात्र कायद्याचा दंडुका उगारताना दिसत आहे.
कोणत्याच व्यक्तीची तक्रार नसताना, कुणालाच त्रास नसताना रस्त्याच्या कडेला चहा टपरी चालविणाऱ्यालाही पोलीस हप्तेखोरीतून वगळायला तयार नाहीत. त्याची टपरी बंद करून त्याच्या कुटुंबीयांच्या रोजीरोटीची पंचाईत करण्याचा प्रतापही सीताबर्डी पोलीस करीत आहेत. पोहेवाल्याचे प्रकरण भोवले असताना ते चहावाल्याला सोडायला तयार नाहीत. हप्तेखोरीत गुंतलेल्या पोलिसांनी अनेक गोरगरिबांची दुकानदारी बंद केली आहे. टपरी बंद न करणाऱ्यांना ते पोलीस ठाण्यातही उचलून नेतात. कोठडीत डांबण्याची धमकी देतात. दुसऱ्या कुणी त्याच्यासाठी पोलिसांसोबत संपर्क केल्यास ‘वरिष्ठांचा आदेश आहे, त्याचे दुकान बंद करण्याचा‘असे सांगून आपल्या पापावर पडदा टाकण्याचे प्रयत्न करतात.

येथे नाहीत का वरिष्ठांचे आदेश ?
महिला चोरट्यांच्या अनेक टोळ्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या मोरभवन बसस्थानक, महाराजबाग बसस्थानकासह सीताबर्डी बाजारपेठ हे या टोळ्यांचे कार्यक्षेत्र आहे. या ठिकाणाहून सावज हेरल्यानंतर अनेकदा त्या बस, आॅटोमध्ये त्या संबंधित महिलेचा पाठलाग करीत विविध भागात जातात आणि संधी मिळताच महिलांच्या पर्स, मंगळसूत्र, सोनसाखळीसह विविध प्रकारचे दागिने (पर्समध्ये रोख अन् दागिने असतात) चोरतात. या टोळ्या कोणत्या, त्यामधील महिला कोण, त्या कुठल्या आहेत, त्या कशा पद्धतीने चोऱ्या करतात, कुणाला माल विकतात, त्याबाबतची बरीचशी माहिती सीताबर्डी पोलिसांना आहे.
बाजारातही सुळसुळाट
सीताबर्डी बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट आहे. रविवारी सीताबर्डीच्या बाजारपेठेत पाय ठेवायला जागा नसतो, एवढी गर्दी उसळते. नागपूर मंडळी, आजूबाजूच्या गावातीलच नव्हे तर सुटीचा दिवस असल्यामुळे बाहेरगावची मंडळीसुद्धा हजारोंच्या संख्येत येथील बाजारपेठेत खरेदीसाठी येतात. ही संधी साधून चोरटे बिनबोभाट हातसफाई करतात. कुणाचे पैशाचे पाकीट तर कुणाची पर्स तर कुणाच्या मोबाईलसारख्या चिजवस्तू लंपास करतात. या चोरट्यांकडेही सीताबर्डी पोलीस अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात. अनेकदा कुणी तक्रार करीत नाहीत. कुणी तक्रार करण्यासाठी आले तर हरविले, गहाळ झाले, अशी तक्रार नोंदवून घेतली जाते.
लॉजमधील पाप दुर्लक्षित
सीताबर्डीत काही लॉज विशिष्ट प्रकारासाठी ओळखल्या जातात. येथे अनैतिक कृत्य चालतात. अनेकदा पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकांनी तेथे कारवाईसुद्धा केली आहे. दलालांची तेथे नेहमी वर्दळ बघायला मिळते. सीताबर्डीतील थकले भागले की काही जण येथेच आराम करतात अन् त्यांच्याकडून नियमित मोठा हप्ताही घेतात. अशा ठिकाणी पोलिसांना त्यांचे वरिष्ठ कारवाईसाठी जाण्यास अडवतात काय, असा प्रश्न आहे.

Web Title: Give it up ... Make a business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.