हात दे तू साथ दे, प्रित दे अभिजात दे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:39 PM2018-02-13T23:39:07+5:302018-02-13T23:44:13+5:30
माणसामाणसांनी परस्पर प्रेमबंधनात एकमेकांना गुंतवावे असा प्रचार इतिहासकाळातील ख्रिश्चन धर्मगुरू सेंट व्हॅलेंटाईन याने केला होता. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी व्हॅलेंटाईन डे साजरा करणे सुरू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेम. आहे तसा अडीच अक्षराचाच शब्द. पण, त्याची अथांगता जगाला व्यापून उरणारी आहे. इतिहासाचे कोणतेही पान उलटून बघा. मग तो काळ कृष्ण-राधेचा असेल, लैला-मजनूचा असेल वा रोमियो-जुलियटचा. भूगोलाचे चित्र वेगळे असले तरी प्रेम जसे सत्य अन् शास्वत आहे तसेच सार्वत्रिकही आहे. म्हणूनच अगदी प्रारंभापासून विरोधाच्या वादळ वाऱ्यातही प्रेमाची ही उज्ज्वल पणती कायम तेवत आली आहे. या सर्व काळांमध्ये व्हॅलेंटाईन डे नव्हता. पण, म्हणून प्रेमाची अभिव्यक्ती कधी थांबली नाही. ती अखंड अविरत सुरूच आहे. हो...व्हॅलेंटाईन डेने या अभिव्यक्तीचा हा कॅनव्हास आणखी विस्तारला हे खरे आहे आणि म्हणूनच हा प्रेमदिवस जगभरातील तरुणाईचा जीव की प्राण झाला आहे. यंदाच्या व्हॅलेंटाईन डेलाही प्रेमाच्या लाल रंगात तरुणाई न्हाहून निघणार आहे. शहरात तर यासाठी जय्यत तयारी झाली आहे. पण, प्रेमाचा हा उत्सव केवळ तरुणाईचाच नाही. माणसामाणसांनी परस्पर प्रेमबंधनात एकमेकांना गुंतवावे असा प्रचार इतिहासकाळातील ख्रिश्चन धर्मगुरू सेंट व्हॅलेंटाईन याने केला होता. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी व्हॅलेंटाईन डे साजरा करणे सुरू झाले. याचा अर्थ प्रेमावर विश्वास असणाऱ्या व प्रेमानेच जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक नात्यांचा हा उत्सव आहे. लहान मुलांना त्यांचे आजी, आजोबा अत्यंत प्रिय असतात तर वृध्दांना त्यांची नातवंडे, पणतवंडे लाडकी असतात. यांच्यामधल्या सगळ्या पिढ्यांमधील आप्तांचे आपल्याशी मधुर संबंध असतात. शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी, सहकारी वगैरे अनेक लोकांशी आपला स्नेह जुळतो. अनेक नेते, अभिनेते, खेळाडू, गायक, गायिका आणि इतर कलाकार आपल्याला अगदी मनापासून आवडतात. ही आवड व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. म्हणूनच सर्वच वयोगटातील मंडळी सेलिब्रेशनसाठी उत्सुक आहेत.
शहरात पोहोचला गुलाबांचा जखिरा
गुलाब हे प्रेमाच्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेला गुलाबांची मागणी शतपटीने वाढत असते. ही बाब लक्षात घेऊन फूल विक्रेत्यांनी गुलाबांचा मोठा जखिरा मागविला आहे. विविध दुकानांमधील लालबुंद गुलाबांचे गुच्छे लक्ष वेधून घेत आहेत.
हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी शहरातील हॉटेल्सही सज्ज झाली आहेत. लाल रंगाच्या टी-शर्टने कपडयांची दुकाने सजली आहेत. भेटवस्तू खरेदीचा आलेखही अचानक वाढला आहे. थोडक्यात या प्रेमोत्सवाचा रंग अवघ्या शहरावर चढला आहे.