‘खोके द्या, तुम्हाला मंत्री करून देतो’! भाजप अध्यक्षांच्या नावाने चक्क आमदारांवरच फेकले जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2023 09:52 PM2023-05-16T21:52:09+5:302023-05-16T21:53:07+5:30

Nagpur News गुजरातमधील एका व्यक्तीने चक्क भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी केली व देशातील सहा आमदारांना गंडविण्याचा प्रयत्न केला.

Give me the boxes, I'll make you a minister! In the name of the BJP President, a net was cast on the MLAs | ‘खोके द्या, तुम्हाला मंत्री करून देतो’! भाजप अध्यक्षांच्या नावाने चक्क आमदारांवरच फेकले जाळे

‘खोके द्या, तुम्हाला मंत्री करून देतो’! भाजप अध्यक्षांच्या नावाने चक्क आमदारांवरच फेकले जाळे

googlenewsNext

योगेश पांडे
नागपूर : राजकारणातील घोडेबाजारात खुर्चीसाठी चढाओढ असताना याच स्पर्धेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत गुजरातमधील एका व्यक्तीने चक्क भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी केली व देशातील सहा आमदारांना गंडविण्याचा प्रयत्न केला.

त्याने राज्य किंवा केंद्रात मंत्रीपद मिळवून देतो असा दावा करत आमदारांना कोट्यवधींची मागणी केली. भाजपचे आमदार विकास कुंभारे यांना संशय आल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली व त्यानंतर आरोपीची पोलखोल झाली. नीरज सिंह राठोड (मोरबी, अहमदाबाद) असे तोतया स्वीय सहायकाचे नाव असून या प्रकारामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार राठोड याने भाजपच्या सहा आमदारांना मंत्रीपदासाठी फोन केले होते. यात मध्य नागपूरचे आ.विकास कुंभारे, कामठीचे आ.टेकचंद सावरकर, हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे, जालन्यातील बदनापूरचे आ.नारायण कुचे, तसेच गोवा येथील आ. प्रवीण अगलेकर आणि नागालँडचे आ. बाशा चँग यांचा समावेश आहे. दोन आठवड्यांअगोदर विकास कुंभारे यांना नीरज सिंह राठोड याचा फोन आला. त्याने जे.पी.नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत अगोदर एका कार्यक्रमासाठी सहकार्य हवे आहे असे म्हटले. त्यानंतर तुमचे नाव मंत्रीपदासाठी सुरू असून तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर त्याने अगोदर १.६६ लाख व नंतर आणखी लागले तर पैसे देण्यासाठी तयार रहा असे सांगितले.

त्यानंतर त्याने तीन ते चार वेळा आ.कुंभारे यांना फोन केला. मात्र राज्यात कधी मंत्रीपदाबाबत विचारणा झाली नसताना अचानक दिल्लीहून अशी विचारणा होते व पैसे मागितले जात असल्याने कुंभारे यांना संशय आला. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता असे काहीच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुंभारे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत त्यांच्या कानावर हा प्रकार टाकला. तसेच तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत नीरजला गुजरातमध्ये जाऊन अटक केली. त्याला नागपुरात आणण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या अनेक आमदारांशी संपर्क ?
नीरजला नागपुरात आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याने केवळ हेच सहा आमदार नव्हे तर भाजपच्या अनेक आमदारांशी संपर्क साधला असल्याची शक्यता आहे. त्याच्या चौकशीतून आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे. सोबतच त्याच्यासोबत आणखी कोण साथीदार आहेत व त्याचा बोलविता धनी कोण आहे याचीदेखील चौकशी सुरू आहे.

पक्षनिधीमुळे आला संशय
नीरजने कुंभारे यांना केलेल्या प्रत्येक फोनमध्ये मंत्रीपदाच्या बदल्यात पक्षनिधीसाठी पैसे द्यावे लागतील असे म्हटले. पक्षनिधीवर त्याचा जास्त जोर असायचा व त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे आमदारांना त्याचा संशय आला, असे कुंभारे यांनी सांगितले. त्याने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी चक्क एक लिंकदेखील त्यांना पाठविली होती, असे कुंभारे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Give me the boxes, I'll make you a minister! In the name of the BJP President, a net was cast on the MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.