मेडिकलला ऑक्टोबरपर्यंत एमआरआय मशीन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:07 AM2021-07-01T04:07:49+5:302021-07-01T04:07:49+5:30
नागपूर : मेडिकलला येत्या ऑक्टाेबरपर्यंत नवीन एमआरआय मशीन देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला. ...
नागपूर : मेडिकलला येत्या ऑक्टाेबरपर्यंत नवीन एमआरआय मशीन देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विदर्भातील सरकारी रुग्णालयांमधील समस्यांसंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यात न्यायालय मित्र ॲड. अनुप गिल्डा यांनी नोट सादर करून मेडिकलमधील एमआरआय मशीन १८ महिन्यापासून बंद पडली आहे, अशी माहिती न्यायालयाला दिली होती. त्याच्या प्रत्युत्तरात राज्य सरकारने नवीन एमआरआय मशीन खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया येत्या २३ जुलैपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता सदर आदेश दिला. सध्या मेडिकल रुग्णालय एमआरआयकरिता मेयो रुग्णालयावर अवलंबून आहे. मेडिकलमधील रुग्णांना एमआरआय करण्यासाठी मेयो रुग्णालयात पाठविले जात आहे. त्यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याशिवाय महानगरपालिकेने २०१३ व २०१६ मध्ये मेयो व मेडिकल या दोन्ही रुग्णालयांचे फायर ऑडिट करून प्रशासनाला आवश्यक आग प्रतिबंधक उपाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, प्रशासनाने त्या सूचनांचे पालन केले नाही. त्यामुळे दोन्ही रुग्णालये धोकादायक झाली आहेत. न्यायालयाने राज्य सरकारला यासंदर्भातही आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले.