डीपीसीमधून वाढीव निधी द्या!

By admin | Published: February 9, 2016 02:53 AM2016-02-09T02:53:12+5:302016-02-09T02:53:12+5:30

गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या शासकीय रुग्णालयांना बांधकाम व उपकरण खरेदीसाठी मिळणारा ..

Give more funding from DPC! | डीपीसीमधून वाढीव निधी द्या!

डीपीसीमधून वाढीव निधी द्या!

Next

अधिष्ठात्यांची मागणी : पालकमंत्र्यांनी घेतली दखल
नागपूर : गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या शासकीय रुग्णालयांना बांधकाम व उपकरण खरेदीसाठी मिळणारा जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) निधी वाढवून देण्याची विनंती मंगळवारी शहरातील तिन्ही शासकीय रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यात मदत करण्याची विनंती केली.
विनोद तावडे यांनी सोमवारी सकाळी मेडिकल, मेयो व शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांची बैठक बोलविली होती. या बैठकीत ‘डीपीसी’च्या परत जाणाऱ्या निधीवर चर्चा झाली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या विकासासाठी चालू वर्षात ‘डीपीसी’तून १० कोटी आणि नंतरच्या वर्षात १० कोटींचा निधी देण्याची मागणी केली. ते म्हणाले, मार्च महिन्यात ३० खाटांच्या ट्रॉमा केअरला सुरुवात होत आहे. परंतु पुढील दोन वर्षांत पूर्ण रूपात हे सेंटर सुरू होणे आवश्यक आहे. यासाठी साधारण ५० कोटींची गरज आहे. डीपीसीमधून २० कोटी आणि उर्वरित ३० कोटी केंद्राच्या महामार्ग योजनेतून हा निधी मिळाल्यावरच हे शक्य आहे. यावर विनोद तावडे यांनी पालकमंत्री बावनकुळे यांना मदत करण्याची विनंती केल्यावर त्यांनी याला हमी दिल्याचे सांगण्यात येते. यावेळी मेयोचे अधिष्ठाता डॉ. मधुकर परचंड व शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Give more funding from DPC!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.