‘दीनदयाल थाळी’साठी राज्यभरात जागा द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:15 AM2017-12-17T00:15:19+5:302017-12-17T00:20:09+5:30
‘पं. दीनदयाल थाळी’ हा प्रकल्प रुग्णसेवेतील पुढचा टप्पा ठरणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी ज्या संस्था पुढे येतील त्यांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने राज्यातील मेडिकलमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : ‘पं. दीनदयाल थाळी’ हा प्रकल्प रुग्णसेवेतील पुढचा टप्पा ठरणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी ज्या संस्था पुढे येतील त्यांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने राज्यातील मेडिकलमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
युवा झेप प्रतिष्ठानतर्फे मेडिकलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना १० रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्याच्या ‘पं. दीनदयाल थाळी’ प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यासह खा. अजय संचेती, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. नागो गाणार, आ. डॉ. मिलिंद माने, आ. अनिल बोंडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, महापौर नंदा जिचकार, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व मनपाचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी उपस्थित होते.
गोरगरिबांच्या सेवेसाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते, परंतु त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची जेवणाची व्यवस्था नसते. ‘पं. दीनदयाल थाळी’ प्रकल्पामुळे अशा नातेवाईकांची भूक आता भागवली जाईल. ही खऱ्या अर्थाने ईश्वरीसेवा आहे, असेही ते म्हणाले.
अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे अशा उपक्रमांना गहू, तांदूळ पुरविण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, असे आश्वासन गिरीश बापट यांनी यावेळी दिले. मक्यासारखे धान्य गोशाळांना देण्यासंदर्भातही विचार केला जाईल, असे बापट म्हणाले. प्रास्ताविक नगरसेवक संदीप जोशी यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. बंडू राऊत यांनी आभार मानले.
आरोग्य शिबिरांची नोंद गिनीज बुकमध्ये!
राज्यात जळगाव, औरंगाबाद, बीड, नाशिक व नागपूर या शहरांमध्ये महाआरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. यातून लाखो रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत आहे. ही आरोग्य क्रांती आहे. याची नोंद भविष्यात ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होईल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
गडकरी यांच्याकडून पाच लाखांची मदत
सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सुरू केलेल्या पं. दीनदयाल थाळीतून भुकेल्या गरीब, पीडिताला पोटभर अन्न मिळेल. सामाजिक आर्थिक कमकुवत आहेत त्यांना ‘रोटी, कपडा, मकान’ उपलब्ध होईल, असा आशावाद व्यक्त करून नितीन गडकरी यांनी पं. दीनदयाल थाळी उपक्रम राबविणाºया संस्थेला पाच लाखांची मदत करण्याचे आश्वासन दिले.
ओपीडीचे मुख्य प्रवेशद्वार बंद
‘दीनदयाल थाळी’च्या लोकार्पण कार्यक्रमात येणाऱ्या लोकांचा रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून मेडिकल प्रशासनाने बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. रुग्णांना ओपीडीच्या मागील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात आला होता. मात्र, मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप पाहून अनेक रुग्ण विना उपचार परतले तर काहींना फेऱ्या मारून ओपीडीत जावे लागले. दुपारी १२.३० नंतर मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप उघडण्यात आले.