मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य द्या
By आनंद डेकाटे | Published: April 29, 2024 05:35 PM2024-04-29T17:35:37+5:302024-04-29T17:39:26+5:30
महासंचालक नंदकुमार : नागपूर विभागाची आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बांबू लागवडीमुळे रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षण, हरित आच्छादनात वाढ होते व सिंचन व्यवस्था बळकट होण्यास मदत होत असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) नागपूर विभागात बांबू लागवडीची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांनी सोमवारी संबंधित विभागांच्या यंत्रणांना दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘समता मुलक शाश्वत पर्यावरणीय विकासातून समृद्धीसाठी मनरेगा मिशन मोडवर राबविणे’ विषयावर नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखालील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, पर्यावरण व वातावरणीय बदलाचे संचालक अभिजित घोरपडे, रोहयोच्या उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांच्यासह नागपूर, चंदपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंधारण, वने व पर्यावरण, पाटबंधारे, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मनरेगांतर्गत चालू आर्थिक वर्षात राज्यात १ लाख हेक्टर क्षेत्रावर हरित आच्छादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून गरिबी निर्मूलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना नंदकुमार यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त बिदरी यांनी नागपूर विभागात मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच, बांबू लागवडीला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. कोनबॅक बांबू संस्थेचे संजीव करपे यांनी बांबू लागवड, उत्पादन आणि विपनण आदी विषयांवर मार्गदर्शन केले. राज्यात बांबू लागवडीसाठी नेमण्यात आलेल्या टास्कफोर्स, स्टिअरिंग कमिटी आणि टेक्निकल कमिटी आदींविषयी अभिजित घोरपडे यांनी माहिती दिली. राजलक्ष्मी शहा यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.