मुस्लिमांना आरक्षण द्या!
By admin | Published: March 1, 2015 02:24 AM2015-03-01T02:24:47+5:302015-03-01T02:24:47+5:30
सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे दाखले सादर करीत महाराष्ट्रातील मुस्लिमांना संविधानिक अधिकारानुसार आरक्षण मिळालेच पाहिजे, ...
नागपूर : सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे दाखले सादर करीत महाराष्ट्रातील मुस्लिमांना संविधानिक अधिकारानुसार आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लेमीन (एमआयएम) चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज येथे जाहीरपणे केली. गेल्या ६५ वर्षात मुस्लीम समाजावर सातत्याने अन्याय करण्यात आला. याविरोधात आवाज उचलला असता त्यांच्यावर कठोर बोलत असल्याचा आरोप केला जातो. परंतु जोपर्यंत मुस्लिमांवरील अन्याय दूर होणार नाही तोपर्यंत त्यांना बोलण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एमआयएम नागपूर शाखेतर्फे आसीनगर झोन कार्यालय समोरील बुद्धा पार्क मैदानात आयोजित पहिल्याच जाहीर सभेला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
ओवैसी यांना नोटीस
खा. असदुद्दीन ओवैसी हे आपल्या नियोजित सभेसाठी नागपुरात पोहोचताच त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली. ओवैसी रविभवन येथे पोहोचताच पोलीस निरीक्षक आर.डी. निकम यांनी त्यांना नोटीस दिली. कलम १४४ अंतर्गत बजावण्यात आलेल्या या नोटीसमध्ये ओवैसी यांना वादग्रस्त भाषण न करण्याची ताकीद देण्यात आली. यानंतर सभेमध्ये आपल्या भाषणात ओवैसी या नोटीससंदर्भात चिमटा काढीत म्हणाले की, त्यांना नोटीस न मिळाल्याने खाज सुटते. अशा कितीही नोटीस मिळाल्या तरी मुस्लिमांवरील अन्यायाचा मुद्दा मांडण्यापासून आपल्याला कोणीच अडवू शकणार नाही.
पत्रकारांवर दगडफेक
सभेदरम्यान काही तरुणांनीपत्रकारांवर दगडफेक केली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांना संयम ठेवण्याची विनंती केली. ओवैसी यांचे भाषण सुरू असताना एकाने जोशात येऊन शिवी दिली. ओवैसी यांनी यावर आक्षेप घेतआपल्याला लोकशाही पद्धतीने लढा द्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सामाजिक सद्भाव व शांती ही सर्वोपरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनाही केले लक्ष्य
ओवैसी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, खरच पंतप्रधानांना ‘सबका साथ सबका विकास’ हवा आहे, तर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचे आदेश द्यावे. पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य हे परस्परविरोधी असते. तेव्हा कोण खरं बोलत आहे, हेच कळत नाही.