मराठा समाजाला ओबीसीतून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्या - रामदास तडस

By गणेश हुड | Published: October 28, 2023 08:12 PM2023-10-28T20:12:56+5:302023-10-28T20:13:28+5:30

सिव्हिल लाईन येथील जवाहर विद्यार्थी गृहात रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची विभागीय बैठक पार पडली.

Give separate reservation to Maratha community not from OBC - Ramdas Tadas | मराठा समाजाला ओबीसीतून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्या - रामदास तडस

मराठा समाजाला ओबीसीतून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्या - रामदास तडस

नागपूर : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.  यावर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी शनिवारी मांडली.

सिव्हिल लाईन येथील जवाहर विद्यार्थी गृहात रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची विभागीय बैठक पार पडली. या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत रामदास तडस म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने विरोध दर्शविला आहे.

ओबीसीचा एक घटक असलेल्या तेली समाजाचा ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले जाणार नाही. स्वतंत्र आरक्षण देवू ,असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे. असे असतानाही जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांनी टोकाची भूमिका घेवू नये, यामुळे समाजासमाजात तेढ निर्माण होईल. याची जाण सर्व नेत्यांनी ठेवावी. असे आवाहन तडस यांनी केले.

सरकारने जातीय जनगणना करावी. यामुळे ओबीसीमध्ये किती जाती येतात. त्यांची लाेकसंख्या किती हे स्पष्ट होईल. मध्यप्रदेश, बिहार व राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात तेली घाणा महामंडळाची स्थापना करावी. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत तेली समाजाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी रामदास तडस यांनी यावेळी केली. नागपूर विभागाप्रमाणे राज्यातील अन्य विभागातही तैलिक महासभेच्या बैठकींचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीला नागपूरसह पूर्व विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Give separate reservation to Maratha community not from OBC - Ramdas Tadas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.