मनपाला ५०० कोटीचे विशेष अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 08:29 PM2020-09-24T20:29:20+5:302020-09-24T20:33:49+5:30
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसायालाही फटका बसला. याचा परिणाम महापालिकेच्या करवसुलीवर झाला आहे. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारकडे ५०० कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी गुरुवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसायालाही फटका बसला. याचा परिणाम महापालिकेच्या करवसुलीवर झाला आहे. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारकडे ५०० कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी गुरुवारी दिली.
महापालिकेची यंत्रणा कोरोना नियंत्रण व उपाययोजनात व्यस्त असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत मनपाचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी, बाजार, नगररचना व अन्य विभागाचे उत्पन्न घटले आहे. त्यातच शासन अनुदानातही घट झाली आहे. याचा परिणाम शहरातील विकास कामांवर झाला आहे.
मनपाला दर महिन्याला ११५ कोटींचा खर्च करावा लागतो. कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन, वीज बिल, कच्चे पाणी आदींचा यात समावेश आहे.
उत्पन्न व आवश्यक खर्च विचारात घेता फारसा निधी शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत निधी उपलब्ध होत नसल्याने शहरातील विकास कामांवर याचा परिणाम होत आहे. सुरू असलेली विकास कामे व प्रस्तावित अत्यावश्यक विकासकामासाठी निधीची गरज आहे.
बजेट ऑक्टोबरमध्ये
मनपाचे वर्ष २०२०-२१ या वर्षाचे बजेट सप्टेंबर महिन्यात मांडले जाणार होते. परंतु मनपाची यंत्रणा कोरोना नियंत्रणात व्यस्त असल्याने व तांत्रिक अडचणीमुळे ३० तारखेपर्यंत बजेट सादर होण्याची शक्यता नाही. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात बजेट सादर केले जाणार आहे. सभागृहात बजेट सादर केल्यानंतर आयुक्तांची मंजुरी आवश्यक असते. यात ऑक्टोबर महिना जाणार आहे. म्हणजेच स्थायी समितीचे बजेट नोव्हेंबरपासून अमलात येण्याची शक्यता आहे.