मांढळला नगरपंचायतीचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:09 AM2021-05-14T04:09:26+5:302021-05-14T04:09:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मांढळ : कुही तालुक्यातील सर्वांत माेठी ग्रामपंचायत व बाजारपेठ म्हणून मांढळची ओळख आहे. परंतु, मूलभूत सुविधांचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : कुही तालुक्यातील सर्वांत माेठी ग्रामपंचायत व बाजारपेठ म्हणून मांढळची ओळख आहे. परंतु, मूलभूत सुविधांचा अभाव आणि विकासकामांअभावी मांढळ नगरीचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. त्यामुळे लाेकसंख्येच्या आधारावर मांढळ ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सुमारे १५ हजार लाेकसंख्या असलेल्या मांढळ ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्य व सरपंच पदारूढ आहेत. एकूण सहा वाॅर्ड असलेल्या ग्रामपंचायतीत एक ग्रामविकास अधिकारी, तसेच आकृतिबंधानुसार चार, तसेच ग्रामपंचायतीने नियुक्त केलेले सात कर्मचारी कार्यरत आहेत. मांढळ येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, शाळा-महाविद्यालये, विविध संस्थादेखील आहेत. मात्र, ग्रामपंचायत असल्याने ग्रामविकास विभागातून कमी प्रमाणात निधी उपलब्ध हाेत असल्याने गाव विकासापासून काेसाे दूर आहे. गावातील नाल्यांची नियमित साफसफाई हाेत नाही. अंतर्गत रस्त्याची समस्या, पाणीटंचाई, आदी अनेक समस्या ‘जैसे-थे’ आहेत. यात निधीची कमतरता सांगितली जाते. त्यामुळे मांढळ ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यास गावातील विकासकामे व प्रश्न मार्गी लागतील, असा सूर नागरिकांत आळवला जात आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे सदस्य मनीषा फेंडर यांच्याशी चर्चा केली असता, मांढळला नगरपंचायत हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे गावाचा विकास साधता येईल. मुख्याधिकारी मिळाल्याने प्रशासकीय कामकाज सुरळीत हाेईल. शिवाय निधी अधिक प्रमाणात उपलब्ध हाेऊन विकासकामे पूर्ण हाेतील, असे त्यांनी सांगितले. पंचायत समिती सदस्य मंदा डहारे, सरपंच शाहू कुलसंगे यांनीही मांढळला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा, असे सांगितले. लीलाधर धनविजय, माजी जि. प. सदस्य उपासराव भुते, माजी सरपंच राजेश तिवसकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप कुलरकर, भागेश्वर फेंडर, तसेच नागरिकांनी मांढळ नगरपंचायत व्हावी, यावर सहमती दर्शविली आहे.