रेल्वे गाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश द्या; प्रवासी संघटनेची मागणी
By नरेश डोंगरे | Published: April 9, 2024 07:17 PM2024-04-09T19:17:07+5:302024-04-09T19:18:31+5:30
प्रत्येक कोचमध्ये गार्ड नेमा, प्रवासी संघटनेची मागणी : रेल्वे बोर्ड, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे गाड्यांमधील वाढलेली प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश द्या आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक कोचमध्ये नियुक्त करा, अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे बोर्डाच्या दिल्लीतील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
अलिकडे नागपूर स्थानकावरून विविध मार्गावर धावणाऱ्या वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी प्रचंड गर्दी करीत आहेत. खास करून राप्ती सागर एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम, गोरखपूर एक्सप्रेस, हैदराबाद, हावडा, मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, जयपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आधीच पाय ठेवायला जागा नसताना प्रवासी त्यात बसण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. या संबंधाने दोन दिवसांपूर्वी 'लोकमत'ने सचित्र वृत्तही प्रकाशित केले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांसह रेल्वे बोर्डाच्या शिर्षस्थांना पत्र लिहून त्यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. पत्रातून त्यांनी म्हटले आहे की, रेल्वे गाडीची प्रवासी क्षमता पूर्ण झाल्यानंतर त्यात गाडीत कोणताही अतिरिक्त प्रवासी चढू नये, यासाठी ड्युटीवर असलेल्या टीटीई तसेच स्टेशन स्टाफला तिकिट बनवू नये, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र, उत्पन्नाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सामान्य श्रेणीच्या प्रवाशांना स्लिपरचे तिकिट देऊन त्यांना स्लिपर कोचमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येते. परिणामी त्या कोचमध्ये अतिरिक्त गर्दी होते. त्याचा फटका आरक्षण करून कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतो. त्यांना अतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीचा त्रास होतो.
कुठेच जागा नसल्याने ही मंडळी टॉयलेटजवळ बसतात. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची तीव्र कुचंबना होते. हे सर्व टाळण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश देण्याची आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक कोचमध्ये नेमण्याची मागणी शुक्ला यांनी या पत्रातून केली आहे.
दखल घेणार का ?
प्रवासी संघटनेकडून करण्यात आलेल्या या मागणीची रेल्वे बोर्ड किंवा मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडून किती तत्परतेने आणि कशा प्रकारे दखल घेतली जाते, त्याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.