विरोधकांच्या दुष्प्रचाराला योग्य उत्तर द्या : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:30 PM2019-02-07T23:30:10+5:302019-02-07T23:31:03+5:30
मागील ६० वर्षात जे काम झाले नाही ते आपण पाच वर्षांत करुन दाखविले. सरकारच्या कामांवर टीका करायला जागाच उरली नाही. त्यामुळेच विरोधक आता जातीयवाद, सांप्रदायिक वाद आणि खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. कार्यकर्त्यांनी यासंदर्भात सजग राहून विरोधकांच्या दुष्प्रचाराला योग्य उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूर, भंडारा, रामटेक लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संमेलनादरम्यान ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील ६० वर्षात जे काम झाले नाही ते आपण पाच वर्षांत करुन दाखविले. सरकारच्या कामांवर टीका करायला जागाच उरली नाही. त्यामुळेच विरोधक आता जातीयवाद, सांप्रदायिक वाद आणि खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. कार्यकर्त्यांनी यासंदर्भात सजग राहून विरोधकांच्या दुष्प्रचाराला योग्य उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूर, भंडारा, रामटेक लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संमेलनादरम्यान ते बोलत होते.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. प्रा. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, महापौर नंदा जिचकार प्रामुख्याने उपस्थित केले. केंद्र सरकारने कधीही कुठलीही योजना राबविताना भेदभाव केला नाही. दीक्षाभूमी व ड्रॅगन टेम्पलचा विकास केला. गरिबांचे जीवन सुसह्य केले. हे सर्व लाभ देताना कोणताही भेदभाव न करता दिले. कुणाचीही जात विचारून हे लाभ दिले नाही. सबका साथ सबका विकास या धोरणाने आपण काम केले. मात्र असे असतानादेखील भाजपावर जातीयवादी असल्याचा आरोप लावण्यात येतो. येत्या लोकसभा निवडणुकांतील विजय हा कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे, असे गडकरी म्हणाले.
विकास कामांमध्ये आपण आज कुठेही कमी नाही. पण संघटनेत मात्र कार्यकर्त्यांचे संबंध कसे असावेत हे आपण जाणले पाहिजे. नवीन माणसे उभी करा, सर्व समाजातील सर्व कार्यकर्त्यांना यथोचित सन्मान मिळाला पाहिजे, असेदेखील त्यांनी सांगितले.
कठोर निर्णय पक्षहितासाठी असतात
पक्षाचे काम करताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. ते पक्षाच्या हितासाठी घ्यावे लागतात. काही वेळा कार्यकर्ते नाराज होतात, मात्र तीच खरी परीक्षा असते. युध्दात सैनिक शस्त्रापेक्षा मनाने लढतो. त्यासाठी आधी मनस्थिती बनवून घ्यावी लागते. मने जुळली तर युध्द जिंकता येते. बाहेरून आलेल्या लोकांनादेखील आपल्यासारखे बनविले पाहिजे, असे प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केले.
समृद्धी महामार्ग आता गोंदियापर्यंत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महामार्ग झाल्यानंतर गोंदियापासून ते मुंबईपर्यंतचे अंतर केवळ सात तासात कापता येईल, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. रामटेक, नागपूर, भंडारा गोंदियाच्या प्रत्येक शक्तीकेंद्र प्रमुखाने ७०० तर बूथप्रमुखाने १५० घरांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अनुपस्थित केंद्रप्रमुखांची मागविली नावे
संमेलनादरम्यान संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांनी विधानसभानिहाय शक्तीकेंद्र प्रमुखांची हजेरीच घेतली. अनुपस्थित असलेल्या केंद्रप्रमुखांची नावे त्यांनी मंडळ अध्यक्षांकडून मागविली आहेत. गोंदिया शहरातील २२ पैकी केवळ सात प्रमुखच सभागृहात उपस्थित होते.
राहुल स्वत:ला लोकशाहीहून मोठे समजतात : रावत
यावेळी त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल गांधी स्वत:ला लोकशाहीहून मोठे मानतात. राफेल विमान करारात सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतरदेखील ते त्या मुद्द्यावर अडून बसले आहेत, असे रावत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने भारताची ओळख सर्व जगात करून दिली. डोकलाममधून चीनला हुसकावून लावले व काश्मीर प्रश्न चिघळू दिला नाही. आज तेथील भ्रष्टाचार अखेरचा श्वास घेत आहे, असा दावा त्यांनी केला.