विड्याच्या पानाला पिकाचा दर्जा द्या, विम्याचे संरक्षण द्या!
By योगेश पांडे | Published: December 12, 2023 06:23 PM2023-12-12T18:23:01+5:302023-12-12T18:23:54+5:30
विड्याचे पान व पानपिंपरी या पिकांना कृषी पिकाचा दर्जा देत विम्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आ.प्रवीण दटके यांनी विधानपरिषदेत केली.
नागपूर : विदर्भात विड्याचे पान खाणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे व हजारो शेतकरी या पानांचे उत्पादन करतात. अवकाळी पावसाचा संबंधित शेतकऱ्यांनादेखील फटका बसतो. मात्र याला कृषी पीक म्हणून मान्यताच नसल्याने विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे विड्याचे पान व पानपिंपरी या पिकांना कृषी पिकाचा दर्जा देत विम्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आ.प्रवीण दटके यांनी विधानपरिषदेत केली. नियम ९७ अन्वये अवकाळी पावसावर सुरू असलेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान ते बोलत होते.
विड्याचे पान खाणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात खूप आहे. पानपिंपरीतून आयुर्वेदिक औषधे तयार होता. हजारो शेतकरी याचे उत्पादन घेतात. मात्र ते हवालदील झाले आहेत, याकडे दटके यांनी लक्ष वेधले. पीक विमा कंपन्यांकडून नागपुरातील काही शेतकऱ्यांना १२, ५२, ५६ रुपयांची रक्कम देण्यात आली. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष घालावे, कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टा करू नये अशी मागणी त्यांनी केली.
- मिटकरींची मागणी, अधिवेशन वाढवा
अमोल मिटकरी यांनी हिवाळी अधिेवशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशन हे विदर्भातील मुद्द्यांवर व्हावे यासाठी भरवले जाते. मात्र विदर्भाच्या मुद्द्यांना योग्य तो न्याय मिळत नाही. त्यामुळे या अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा, असे ते म्हणाले.
- पीक विमे कंपन्यांचे फायद्यासाठी?
पीक विमे शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी असतात. मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे पिक विमा हे कंपनीचे फायद्यासाठी असतात का? असा सवाल यांनी अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी प्रज्ञा सातव यांनी सुद्धा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली.