आदिवासींना मूळ निवासीचा दर्जा द्या!
By admin | Published: June 29, 2017 02:36 AM2017-06-29T02:36:38+5:302017-06-29T02:36:38+5:30
आदिवासी हे मूळ निवासीच आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासींना मूळ निवासीचा दर्जा बहाल केला असून
लटारी मडावी : रिपाइं (आ) चा युवा व आदिवासी कार्यकर्ता मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिवासी हे मूळ निवासीच आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासींना मूळ निवासीचा दर्जा बहाल केला असून ९ आॅगस्ट रोजी जागतिक मूळ निवासी दिन पाळला जातो. परंतु भारत सरकारने अजूनही आदिवासींना हा दर्जा बहाल केलेला नाही. तेव्हा केंद्र सरकारने तातडीने आदिवासींना मूळ निवासीचा दर्जा बहाल करावा, अशी मागणी रिपाइं (आ)च्या आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष लटारी मडावी यांनी बुधवारी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत केली.
लटारी मडावी यांनी सांगितले की, आदिवासींच्या विविध प्रश्नांना घेऊन जनआंदोलन उभे करण्याच्या उद्देशाने रिपाइं (आ)च्या आदिवासी सेलच्यावतीने युवा व आदिवासी यांचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा येत्या १ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वानाडोंगरी येथील राजीव गांधी पॉलिटेक्निक परिसरातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे अध्यक्षस्थानी राहतील. माजी खासदार दत्ता मेघे, आमदार समीर मेघे हे या मेळाव्याला मार्गदर्शन करतील. या मेळाव्यात संयुक्त राष्ट्राने जाहीर केल्याप्रमाणे आदिवासींना मूळ निवासीचा दर्जा बहाल करणे, आदिवासीतील बोगस आदिवासींची घुसखोरी थांबविणे, आदिवासींट्आ पारंपरिक कायद्याला मान्यता देणे, पेसा कायदा सक्तीने लागू करणे, कुमारी मातांचे पुनर्वसन, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात जलदगती न्यायालय सुरू करणे, नक्षली विधवांचे पुनर्वसन, आदिवासीतील कुपोषण थांबविणे यावर सखोल चर्चा करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या धर्तीवर सर्व महामंडळांचे कर्ज माफ करण्यात यावे, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत वाढ करावी आणि शासकीय वसतिगृहांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेत रिपाइंचे प्रदेश महासचिव विकास गणवीर, शहराध्यक्ष राजन वाघमारे, दिनेश बन्सोड, सतीश तांबे, विनोद थूल, भीमराव मेश्राम, नंदू गावंडे, ज्ञानेश्वर सयाम, विलास कोडापे आदी उपस्थित होते.