पाणी द्या, शेतकऱ्यांची ओरड
By admin | Published: December 19, 2014 12:49 AM2014-12-19T00:49:01+5:302014-12-19T00:49:01+5:30
रामटेक तालुक्यातील महादुला, पंचाळा, मांद्री, घोगरा, मुसेवाडी, गुडेगाव, भंडारबोडी, शिवनी, हंसापूर, किरणापूर आदी गावे कोरडवाहू क्षेत्रात मोडतात. परंतु सिंचनाची सोय नाही. नापिकी ओढवली आहे.
शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा : शेतकरी घेऊन आले ‘मरड’ आलेले धान
नागपूर : रामटेक तालुक्यातील महादुला, पंचाळा, मांद्री, घोगरा, मुसेवाडी, गुडेगाव, भंडारबोडी, शिवनी, हंसापूर, किरणापूर आदी गावे कोरडवाहू क्षेत्रात मोडतात. परंतु सिंचनाची सोय नाही. नापिकी ओढवली आहे. शेतातील धानाला मरड आली असून याकडे मायबाप सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी आज गुरुवारी विधानभवनावर धडक दिली.
शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी मरड (दाणे नसलेल्या लोंब्या) आलेले धान घेऊन आले होते. आम्ही मंत्र्यांकडे जाणार नाही, मंत्र्यांनीच मोर्चात यावे आणि आमचे मागण्यांचे निवेदन स्वीकारावे, या अटीवर शेतकरी अडून बसले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी याची माहिती संबंधित मंत्र्यांना दिल्यावर उशिरा का होईना जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी मोर्चाला भेट दिली. यावेळी शिवतारे यांनी जलसंपदा विभागाची बैठक घेऊन सिंचनाची काय व्यवस्था करता येईल, यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
नेतृत्व
जीवन मुंगले, मनोहर दियेकर, पंकज काटोले, मनोहन बाहुले, दिगांबर वैद्य.
मागण्या
दुष्काळी भागाला कालव्याद्वारे सिंचनाची व्यवस्था करा.
अदानी टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना दरमहा भाडे लागू करा.
धानाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या.
सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या.