काेराेना संक्रमण काळात मजुरांना अधिकाधिक कामे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:09 AM2021-05-11T04:09:15+5:302021-05-11T04:09:15+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेनाचे वाढते संक्रमण आणि मृत्यूदर लक्षात घेता, ते नियंत्रणात आणण्यासाठी काही निर्बंध लावणे आवश्यक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काेराेनाचे वाढते संक्रमण आणि मृत्यूदर लक्षात घेता, ते नियंत्रणात आणण्यासाठी काही निर्बंध लावणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसाय व कामे प्रभावित झाल्याने अनेकांना आर्थिक संकटांना सामाेरे जावे लागत आहे. यात मजुरांची स्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे त्यांना मनरेगाची अधिकाधिक प्रमाणात कामे उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांनी भिलेवाडा (ता. रामटेक) शिवारातील मनरेगाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसाेबतच मजुरांशीही संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
रामटेक तालुक्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा ) अंतर्गत काही कामांना मंजुरी दिली असून, सुरुवात करण्यात आली आहे. यातील काही कामांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांनी पाहणी केली. ही सर्व कामे शासनमान्यता व नियमाच्या अधीन राहून तसेच आर्थिक रेशो बरोबर ठेवून मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावीत. विशेषतः जलशक्ती अभियानामधील जल व मृदा संधारणची कामे प्राधान्याने मजुरांसाठी ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक पातळीवर उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचनाही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी भिलेवाडा शिवारातील नाला खोलीकरण, सरळीकरण व इतर कामांची पाहणी करून त्या कामावरील मजुरांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी, मागण्या समजून घेत त्या साेडविणे व सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. त्यांनी गावातील लाभार्थी भागवत लटारू तुरनकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या जलसंधारणासाठी मॅजिक पिट शोषखड्डा कामाचे भूमिपूजन केले. यावेळी साधारण ४३ मजूर उपस्थित होते.
या दाैऱ्यात तहसीलदार बाळासाहेब मस्के, खंडविकास अधिकारी प्रदीप ब्रम्हनाेटे, तालुका आराेग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार, मनरेगाचे अर्जुन खेवले नरेगा, सरपंच गोपीचंद खडसे, सागर कांबळे, भारत मेश्राम व राजेंद्र बन्सोड, रामहरी कुबडे, राजू मडामे, ईश्वर मलघाटे आदी सहभागी झाले हाेते.
...
लसीकरणाबाबत समुपदेशन
रामटेक तालुक्यात एकूण २९३ कामे सुरू असून, १,२३० मजूर रोज काम करीत आहेत. सन २०२०-२१ मध्ये एकूण तीन लाख मनुष्य दिन निर्मिती केली हाेती. यावर्षी (२०२१-२२) चार लाख मनुष्य दिन निर्मितीचे लक्ष्य आहे, अशी माहिती खंडविकास अधिकारी प्रदीप ब्रम्हनाेटे यांनी दिली. यावेळी मजुरांना काेराेना प्रतिबंधक लसीचे महत्त्व पटवून देत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. इतरांनी केलेल्या चुका समजावून सांगत लस घेण्याबाबत त्यांचे समुपदेशनही करण्यात आले.