भावाला दिले जीवदान; रक्षाबंधनाची अनोखी भेट; झाले लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 05:09 AM2018-08-26T05:09:55+5:302018-08-26T05:10:58+5:30
यकृत देऊन बहिणीने विणला मायेचा धागा!
नागपूर : राखीपौर्णिमेला भावाच्या हाती बहीण बांधते मायेचा धागा. बहिणीला भाऊही भेट देतो, पण तिच्या भावासमोरच काळ उभा होता. स्वत:च्या जिवावर उदार होत, तिने भावाला यकृत दान केले अन् मृत्यूच्या दाढेतून त्याला बाहेर काढले. १५ दिवसांच्या उपचारानंतर भाऊ आणि बहीण रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हॉस्पिटलमधून घरी परतले. ती आज, रविवारी त्याला ओवाळणार आणि राखी बांधणार!
निकिताचा भाऊ प्रणय कुºहाडकर (२४) याचे यकृत निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तातडीने यकृत प्रत्यारोपण न झाल्यास जिवावर बेतू शकते, असा इशाराही दिला. गरीब कुटुंबावर दु:खाची कुºहाड कोसळली. आजारातून सुखरूप बाहेर पडू, अशी आशा प्रणयने सोडून दिली होती. याची माहिती मित्रांपर्यंत पोहोचताच पैशांची जुळवाजुळव सुरू झाली.
यकृतदानासाठी त्याच्या आईने पुढाकार घेतला, परंतु रक्तगट जुळत नव्हता. काय करावे, या विवंचनेत असताना लहान बहीण निकिता समोर आली. ‘मी देते यकृत,’ एवढेच ती म्हणाली, घरच्यांनी तुझे लग्न व्हायचे आहे, असे सांगून तिला चूप केले, परंतु डॉक्टरांनी निकिता हीच पर्याय असल्याचे स्पष्ट केले. आम्हा दोघांना काहीच होणार नाही, हे निकिताने कुटुंबीयांना पटवून दिले. त्यानंतर, न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हे ‘लाइव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट’ झाले.
बहिणीला पुन्हा भाऊ मिळाला
अडचणीत नेहमीच आपल्यासोबत असणारा, साथ न सोडणारा, समजूतदार प्रेमळ असा भाऊ असावा, असे बहिणींना वाटते आणि एखादी भोळीभाबडी, सुंदर मनाची,खट्याळ-खेळकर अशी बहीण असावी, असे भावाला वाटते. अनेकांच्या या इच्छा पूर्णही होतात, परंतु काळ येतो आणि दोघांची परीक्षा घेतो, तेव्हा भावाचे निरागस ‘प्रेम’ आणि बहिणीची अफाट ‘माया’चे वास्तव समोर येते. २३ वर्षीय निकिताच्या समोरही काळ आला होता. तिने भावावरची अफाट माया सिद्ध करून दाखविली.