श्रमिक स्पेशलमध्ये दिला बाळाला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:51 PM2020-06-06T20:51:48+5:302020-06-06T20:53:47+5:30
श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीने गोरखपूरला जात असलेल्या एका महिलेने शुक्रवारी सायंकाळी रेल्वेगाडीतच बाळाला जन्म दिला. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या महिलेची तपासणी केली. महिला आणि बाळाची प्रकृती चांगली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीने गोरखपूरला जात असलेल्या एका महिलेने शुक्रवारी सायंकाळी रेल्वेगाडीतच बाळाला जन्म दिला. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या महिलेची तपासणी केली. महिला आणि बाळाची प्रकृती चांगली होती. त्यांनी प्रवास सुरूच ठेवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली.
रेल्वेगाडी क्रमांक ०७३५५ बंगळुरु-गोरखपूर श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीच्या एस १४ कोचने किरण कुमारी रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश ही महिला प्रवास करीत होती. तिच्या सोबत पती कमलेश कुमार हा होता. नागपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी या महिलेस प्रसुती वेदना सुरु झाल्या. लगेच गाडीतील अन्न वितरण करण्यासाठी नेमण्यात आलेले रेल्वे कर्मचारी राशिद अली यांनी या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण केले. ही गाडी सायंकाळी ६ च्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर आली. परंतु तोपर्यंत या महिलेने एका गोंडस बाळास जन्म दिला होता. रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्लॅटफार्म क्रमांक १ वर या महिलेची तपासणी केली. महिला आणि बाळ सुखरुप होते. महिलेस योग्य तो औषधोपचार दिल्यानंतर रेल्वेच्या डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी प्रवास थांबवून गाडीखाली उतरण्यास सांगितले. परंतु पतीपत्नी दोघांनीही प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली.