पत्नीचे देहदान करून समाजासमोर ठेवला आदर्श
By admin | Published: June 7, 2017 01:59 AM2017-06-07T01:59:20+5:302017-06-07T01:59:20+5:30
मी, माझे घर, माझे कुटुंब या मर्यादित त्रिकोणात आयुष्य जगणाऱ्या आजच्या व्यवहारी जगात एका व्यक्तीने स्वत:सह
तेरवीही नाकारली : आतापर्यंत कुटुंबातील तीन आप्तांचे मृतदेह मेडिकलला सोपवले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मी, माझे घर, माझे कुटुंब या मर्यादित त्रिकोणात आयुष्य जगणाऱ्या आजच्या व्यवहारी जगात एका व्यक्तीने स्वत:सह आपल्या कुटुंबीयांच्या देहदानाचा संकल्प केला. नुसता संकल्पच केला नाही तर एका मागून एक असे तीन जीव मृत्यूने हिरावले असतानाही भावना आवरून हा संकल्प पूर्णत्वास नेला. देहदानाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून सांगत समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे मदन नागपुरे. मदन नागपुरे हे महानगरपालिकेत नोकरीवर आहेत; सोबतच ते एका साप्ताहिकाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीतही सक्रिय आहेत. आपल्या देशात आजही जन्म-मत्यूच्याबाबतीत अनेक धार्मिक समजुती आहेत. एखाद्याचा मृत्यू झाला तर जोपर्यंत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही, या मान्यतेतून एक तर मृतदेहाला अग्नीच्या स्वाधीन केले जाते नाही तर मातीच्या सुपूर्द केले जाते. परंतु याच मृतदेहाचा उपयोग पुढचे अनेक आयुष्य वेळेपूर्वी संपण्याआधी वाचवले जाऊ शकते, असा विचार कुणी करीत नाही. तो विचार समाजात रुजावा, वाढावा यासाठी मदन नागपुरे धडपडत आहेत. याची सुरुवात त्यांनी स्वत:च्या घरापासून केली. २००० साली त्यांची मोठी आई गेली. तेव्हा सर्वप्रथम त्यांनी त्यांचे देहदान केले. २०१६ ला आई गेली. तिचेही देहदान केले. नुकतेच ५ जून रोजी त्यांची पत्नी लता नागपुरे मरण पावल्या. विशेष म्हणजे, ६ जूनला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच्या नेमक्या एक दिवसाआधी पत्नी किडनीच्या आजाराने गेली. ३० वर्षांचा सहप्रवास अर्ध्यावर सोडून गेली. मदन नागपुरे यांनी या डोंगराएवढ्या दु:खातही आपल्या संकल्पानुसार पत्नीचा देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाला सोपवला. सर्व कर्मकांड नाकारून जुन्या कपड्यावरच पत्नीला अखेरचा निरोप दिला. तेरवीच्या नावावर पैशांची उधळपट्टीही त्यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी मृत्यूनंतरचे सोपस्कारही नाकारले.
शरीराला जाळण्या वा पुरण्यापेक्षा वैद्यकीय संशोधनासाठी देणे हा खरा माणुसकीचा धर्म आहे. परंतु या विषयावर नुसता उपदेश करून उपयोग नाही. देहदानाचा विचार आधी कृतीत उतरला पाहिजे म्हणूनच मी याची सुरुवात स्वत:च्या घरापासून केली. २०१५ साली मी व माझ्या ४७ सहकाऱ्यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. देहदानाची ही चळवळ जनचळवळ व्हावी, अशी माझी इच्छा आहे.
- मदन नागपुरे