खोटीनाटी माहिती देऊन महिलेने केले लग्न : ५० लाखांसाठी ब्लॅकमेलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 01:15 AM2019-05-05T01:15:00+5:302019-05-05T01:15:46+5:30
खोटीनाटी माहिती देऊन एका धनाढ्य व्यक्तीसोबत लग्न करणाऱ्या एका महिलेने लग्नानंतर त्याला ब्लॅकमेल करणे सुरू केले. ५० लाख रुपये मिळावे म्हणून त्याला साथीदारांमार्फत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असून, पोलिसांनी याप्रकरणी पीडित पतीच्या तक्रारीवरून त्याची पत्नी समीरा फातेमा मुख्तार अहमद (वय ३५, रा. कामठी) तसेच तिचा साथीदार आनंद पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खोटीनाटी माहिती देऊन एका धनाढ्य व्यक्तीसोबत लग्न करणाऱ्या एका महिलेने लग्नानंतर त्याला ब्लॅकमेल करणे सुरू केले. ५० लाख रुपये मिळावे म्हणून त्याला साथीदारांमार्फत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असून, पोलिसांनी याप्रकरणी पीडित पतीच्या तक्रारीवरून त्याची पत्नी समीरा फातेमा मुख्तार अहमद (वय ३५, रा. कामठी) तसेच तिचा साथीदार आनंद पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मोहम्मद तारिक मोहम्मद अनिस अहमद (वय ३४) यांच्यासोबत समीराने गेल्या वर्षी लग्न केले. तत्पूर्वी आपले यापूर्वी एकच लग्न झाले होते, असे समीराने आपल्या साथीदारांमार्फत तारिकला सांगितले होते. त्यावरून तारिकने तिच्याशी लग्न केले. समीरासोबत लग्न केल्यानंतर तारिकला भलतीसलती माहिती मिळाली. त्यामुळे ५ सप्टेंबर २०१८ पासून या दोघांमध्ये खटके उडणे सुरू झाले. समीराने नंतर तारिकला ५० लाखांची रक्कम मिळावी म्हणून छळणे सुरू केले. त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचीही धमकी दिली. तिचा साथीदार आनंद पवार ८६५२१ ८३८२९ क्रमांकाच्या मोबाईलवरून त्याला तसेच तारिकच्या पत्नीचा भाऊ अंजार जिया यांना अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देऊ लागला. तारिकने हा प्रकार सहन न झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी मानकापूर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी समीरा तसेच आनंद पवारविरुद्ध फसवणूक, ब्लॅकमेलिंग तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.