अवयवदानातून वर्षभरात मिळाले ५१ रुग्णांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 08:18 PM2017-12-29T20:18:13+5:302017-12-29T20:20:02+5:30

मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ (मेंदू मृत) व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. विशेषत: हे वर्ष नागपूर विभागाच्या अवयवदानाच्या चळवळीसाठी महत्त्वाचे ठरले. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त म्हणजे १४ ब्रेनडेड व्यक्तींकडून अवयवदान झाले. परिणामी, ५१ रुग्णांना जीवनदान तर २२ व्यक्तींना बुबूळ मिळाल्याने त्यांच्या जीवनातील अंधार दूर झाला आहे.

Giving life to 51 patients throughout the year from organs donation | अवयवदानातून वर्षभरात मिळाले ५१ रुग्णांना जीवनदान

अवयवदानातून वर्षभरात मिळाले ५१ रुग्णांना जीवनदान

Next
ठळक मुद्दे२२ जणांना मिळाली दृष्टी : १४ ब्रेन डेड व्यक्तींकडून अवयवदान

आॅनलाईन लोकमत
नागपूर : मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ (मेंदू मृत) व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. विशेषत: हे वर्ष नागपूर विभागाच्या अवयवदानाच्या चळवळीसाठी महत्त्वाचे ठरले. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त म्हणजे १४ ब्रेनडेड व्यक्तींकडून अवयवदान झाले. परिणामी, ५१ रुग्णांना जीवनदान तर २२ व्यक्तींना बुबूळ मिळाल्याने त्यांच्या जीवनातील अंधार दूर झाला आहे.
माणसाला मेल्यानंतर देखील जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयव दान. अवयव दानातून दुसऱ्यांना जीवनदान करण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे. सरकार, स्वयंसेवी संस्थांकडून या जागृतीसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न होत असल्याने आताशा थोडेफार लोक अवयव दानासाठी पुढे येऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: ब्रेनडेड व्यक्तींकडून अवयवदानाचा टक्क्यात आणखी वाढ होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतात दरवर्षी दोन लाख किडनीची (मूत्रपिंड) गरज भासते. परंतु प्रत्यक्षात पाच ते सहा हजार किडनी उपलब्ध होतात. दरवर्षी ५० हजार लिव्हरची (यकृत) गरज भासते त्या तुलनेत ७५० लिव्हर प्रत्यारोपण होतात. नेत्रदानातही आपण मागे आहोत.

एका ब्रेनडेड व्यक्तीकडून १० अवयवांचे दान
‘ब्रेनडेड’ घोषित करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू सहा तासांत दोन वेळा रुग्णांची तपासणी करते. मगच रुग्ण ब्रेनडेड झाल्याचे नातेवाईकांना सांगितले जाते. ‘ब्रेनडेड’ रुग्ण म्हणजे मेंदू मृत होतो पण इतर अवयवांचे कार्य सुरूच असते. अशा व्यक्तींकडून मूत्रपिंड (किडनी), फुफ्फुस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, हृदयाच्या झडपा, आतडी, डोळे, कानाचे ड्रम, व त्वचा दान करता येऊ शकते. एक ब्रेनडेड व्यक्ती इतर १० व्यक्तींना नवा जन्म देऊ शकते.
२०१३ मध्ये एका ब्रेनडेड व्यक्तीपासून झाली सुरूवात
अवयवदाता व गरजू रुग्णांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य विभागीय प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी) करते. नागपुरात ही समिती २०१२ मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून अवयवदानाची चळवळ जोर धरू लागली. २०१३ मध्ये पहिल्या ब्रेनडेड व्यक्तीकडून दोन्ही किडनी दान करण्यात आली. त्यानंतर २०१४ मध्ये तीन ब्रेनडेड व्यक्तीकडून पाच किडनी, २०१५ मध्ये चार ब्रेनडेड व्यक्तींकडून सात किडनी, २०१६ मध्ये सहा ब्रेनडेड व्यक्तींकडून १२ किडनी, एक यकृत व त्वचा दान करण्यात आले तर २०१७ मध्ये १४ व्यक्तींकडून २४ किडनी, १२ यकृत, ५ हृदय व २२ बुबुळ व त्वचा दान करण्यात आले. अवयवदानाचा हा आकडा वाढविण्यास ‘झेडटीसीसी’ कार्य मोलाचे ठरले. या समितीचे अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. रवी वानखेडे हे आहेत. या समितीकडून अवयवदानाप्रति होत असलेली जनजागृती व वेळीच निर्णय घेत असल्याने हा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
एक आशादायी चित्र
अवयवदानाच्या जनजागृतीसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाल्याने हा आकडा वाढत आहे. विशेष म्हणजे, २०१३ ते २०१७ या वर्षांत ब्रेनडेड व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडा दुपटीने वाढला आहे. विशेष म्हणजे, या वर्षी सहा-सात ब्रेनडेड व्यक्तींच्या नातेवाईकांनीच अवयवदानासाठी पुढाकार घेतला होता. यामुळे एक आशादायी चित्र निर्माण झाले आहे. अयवदानाची ही चळवळ आता घराघरात पोहचणे आवश्यक आहे.
-डॉ. रवी वानखेडे
सचिव, झेडटीसीसी

Web Title: Giving life to 51 patients throughout the year from organs donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.