चुकीचे पावडर दिल्याने चिमुकल्याचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 03:59 PM2018-05-19T15:59:52+5:302018-05-19T16:00:06+5:30
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रीप्शननुसार औषध न देता चुकीचे औषध दिल्याने नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता. या संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मेडिकल चौकातील शुभम् मेडिकल स्टोअर्सवर कारवाई करीत १५ हजार रुपयांचे तडजोड शुल्क आकारले. परंतु हा दंड कमी असल्याने तक्रारकर्ता ग्राहक न्यायलयात दाद मागण्याच्या तयारीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रीप्शननुसार औषध न देता चुकीचे औषध दिल्याने नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता. या संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मेडिकल चौकातील शुभम् मेडिकल स्टोअर्सवर कारवाई करीत १५ हजार रुपयांचे तडजोड शुल्क आकारले. परंतु हा दंड कमी असल्याने तक्रारकर्ता ग्राहक न्यायलयात दाद मागण्याच्या तयारीत आहे.
प्राप्त तक्रारीनुसार, मुंबई येथील एक कुटुंब नागपुरात माहेरी आले. नऊ महिन्याचा वेंदातही सोबत होता. वेदांतची प्रकृती अचानक बिघडल्याने नातेवाईक त्याला मेडिकल चौकातील एका खासगी बालरोग डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी बालकाला तपासून प्रिस्क्रप्शनवर औषधे लिहून दिली. यात औषधांसोबतच ‘इसम पावडर’चाही समावेश होता. रुग्णाच्या आईने मेडिकल चौकातीलच शुमम् मेडिकल स्टोअर्समधून औषधे खरेदी केली. परंतु स्टोअर्समधील मुलाने ‘इसम पावडर’ ऐवजी मोठ्यांना दिली जाणारी ‘एन्शुअर पावडर’ दिली. रुग्णाला औषधांसोबतच ही पावडरही देण्यात आली. परंतु या पावडरमुळे बालकाची प्रकृती आणखीनच ढासळली. तातडीने त्याच डॉक्टरला दाखविले. डॉक्टराने लिहून दिलेल्या व विकत घेतलेल्या औषधाची शहनिशा केल्यावर औषध विक्रेत्याने चुकीची पावडर दिल्याचे समोर आले. तब्बल ३६ तासानंतर बालकाची प्रकृती धोक्याबाहेर आली. रुग्णाच्या नातेवाईकांनी शुभम् मेडिकल स्टोअर्सकडे याबाबत जाब विचारला असता तेथील काम करणाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. १९ मार्च रोजी नातेवाईकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे या विषयी तक्रार केली. मात्र तब्बल १९ दिवसानंतर ही तक्रार औषधांशी संबंधित नसून अन्न प्रशासनाशी संबंधित असल्याने अन्न प्रशासनाकडे पाठविण्यात आली. परंतु या विभागाकडूनही कारवाई होत नसल्याने अखेर मुख्यमंत्र्यांकडे या विषयी तक्रार करण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशी होताच कारवाईची सूत्रे हलली आणि अन्न प्रशासनाने शुभम् मेडिकल स्टोअर्सवर नियमानुसार १५ हजाराचा तडजोड शुल्क आकारले. परंतु बालकाचा धोक्यात आलेला जीव पाहता, त्या तुलनेत जास्तीचा दंड किंवा कठोर शिक्षा रुग्णांच्या नातेवाईकांना अपेक्षित होती. यामुळे या प्रकरणाला घेऊन नातेवाईक आता ग्राहक न्यायालयात दाद मागणार आहे.
१५ हजार रुपयांचे तडजोड शुल्क
मेडिकल चौकातील शुभम् मेडिकल स्टोअर्स संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारीची शहनिशा करण्यात आली. ‘इसम पावडर’ ऐवजी मोठ्यांना दिले जाणारे ‘एन्शुअर पावडर’ देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. या सारख्या घटनेमध्ये जास्तीत जास्त २५ हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्याचे अधिकार आहेत. परंतु स्टोअर्सधारक नोंदणीधारक असल्याने व गुन्ह्याचे स्वरूप पाहता १५ हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले.
-मिलिंद देशपांडे
सहायक आयुक्त, अन्न प्रशासन, नागपूर शहर