दारूचा ग्लास तरुणाच्या कपाळावर फोडला; नागपुरात बिअर बारमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 18:49 IST2021-10-05T18:49:06+5:302021-10-05T18:49:49+5:30
Nagpur News धंतोलीतील एंकर वन बिअर बारमध्ये दारूच्या नशेत मित्रांसोबत वाद घालणाऱ्या ओळखीच्या तरुणाला हटकणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले.

दारूचा ग्लास तरुणाच्या कपाळावर फोडला; नागपुरात बिअर बारमध्ये हाणामारी
नागपूर - धंतोलीतील एंकर वन बिअर बारमध्ये दारूच्या नशेत मित्रांसोबत वाद घालणाऱ्या ओळखीच्या तरुणाला हटकणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. त्याने दारूचा ग्लास हटकणाऱ्या तरुणाच्या कपाळावर मारून त्याला जखमी केले. वैभव प्रकाश बावणकर (वय १९, रा. वैनगंगानगर) असे जखमीचे, तर अक्षय शंकर लोही (२५) असे आरोपीचे नाव आहे.
बावणकर सिंचन कॉलनीत, तर लोही हा बाजूच्याच चुनाभट्टीत राहतो. वैभव त्याच्या मित्रांसोबत सोमवारी दुपारी ४.३० वाजता धंतोलीतील एंकर वन बारमध्ये गेला. तेथे आरोपी लोही दारूच्या नशेत त्याच्या मित्रांसोबत भांडण करताना दिसला. त्यामुळे वैभवने त्याला हटकले. त्यावरून आरोपी लोहीने वैभवसोबत बाचाबाची केली. वाद वाढत गेला आणि आरोपी लोहीने दारूचा काचेचा ग्लास वैभवच्या कपाळावर मारला. त्यामुळे तो जबर जखमी झाला. दोघांच्याही मित्रांनी या दोघांना दूर केले. त्यानंतर वैभवने लोहीविरुद्ध धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
----