२०२० पर्यंत नागपूर होणार ग्लोबल सिटी
By admin | Published: December 28, 2014 12:38 AM2014-12-28T00:38:40+5:302014-12-28T00:38:40+5:30
नागपुरातील अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) समूहातर्फे जगात २०२० पर्यंत बनविण्यात येणाऱ्या १०० ग्लोबल शहरांमध्ये नागपूरचा समावेश राहील. यासाठी ‘नागपूर फर्स्ट’ नावाने चॅरिटेबल
नागपुरातील एनआरआय समूहाचा पुढाकार : नागपूर फर्स्ट चॅरिटेबल ट्रस्ट
नागपूर : नागपुरातील अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) समूहातर्फे जगात २०२० पर्यंत बनविण्यात येणाऱ्या १०० ग्लोबल शहरांमध्ये नागपूरचा समावेश राहील. यासाठी ‘नागपूर फर्स्ट’ नावाने चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केल्याची माहिती समूहाचे प्रमुख शिकागो येथील अनिवासी भारतीय दिनेश जैन यांनी दिली.
नागपूर फर्स्ट आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ग्लोबल समिटचे आयोजन केले आहे. उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. मंचावर खासदार अजय संचेती, आ. आशिष देशमुख, आ. सुनील केदार होते.
जैन यांनी सांगितले की, १९८४ मध्ये नागपूर सोडले. या शहराशी आपली बांधिलकी आहे. मातीचे कर्ज चुकविण्याची कल्पना २००६ मध्ये मनात आली. विविध देशातील अनिवासी भारतीयांशी चर्चा केल्यानंतर २००८ मध्ये नागपूरला ग्लोबल सिटी बनविण्याची संकल्पना पुढे आली. विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविताना नागपूर फर्स्टने ५ हजार झाडे लावली आहेत. शिवाय अनेक कामे तडीस नेली आहेत. ग्लोबल समिट दरवर्षी भरविण्यात येणार आहे.
नागपूर फर्स्टला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केदार आणि संचेती यांनी दिले. उद्घाटन सत्राचे संचालन संजय अरोरा यांनी केले. शशांक राव, फैज वाहिद आणि निशांत सोमलवार यांनी पाहुण्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. उद्घाटन सत्रानंतर ‘ग्लोबल शहरासाठी ग्लोबल स्टॅन्डर्ड’ यावर चर्चा झाली. यावेळी एनआरआय, व्यावसायिक, उद्योजक आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करावी : गडकरी
नागपुरात गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहे. नागपूर हे उत्पादन हब बनविण्यासाठी अनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांनी सांगितले की, नागपुरात २४ तास पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि टायगर प्रकल्प आहेत. जैविक इंधन क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. टाकाऊ भाज्या आणि फळांपासून बनविलेल्या जैविक इंधनाचे डिझेलमध्ये मिश्रण केल्यास डिझेलचा दर प्रति लिटर १० रुपयांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे आयातीवर होणारा खर्च कमी होऊन रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतील. भारत १०० दशलक्ष डॉलरची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि एक लाख कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करतो. अनिवासी भारतीयांनी या दोन्ही क्षेत्रात उत्पादन प्रकल्प नागपुरात सुरू करावेत. विदर्भात पर्यटनाच्या प्रचंड संधी असल्याचे गडकरी म्हणाले. वैदर्भीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनिवासी भारतीयांनी मिहान-सेझमध्ये विविध उद्योग सुरू करावे, नागपूरला जैविक फार्मिंग कॅपिटल बनवावे, कॉटन आणि सिल्क टेक्सटाईल इंडस्ट्री, मायनिंग आणि मिनरल ट्रेडिंग, लॉजिस्टिक सेंटर सुरू करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.