अवनीच्या न्यायासाठी नागपुरात ग्लोबल शांती मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:24 PM2018-11-10T22:24:43+5:302018-11-10T22:26:11+5:30
यवतमाळच्या पांढरकवडा जंगलातील कथित नरभक्षक वाघिण अवनीची हत्या करण्यात आली असून तिला न्याय मिळावा, या मागणीसाठी रविवारी ग्लोबल पीस मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती या वैश्विक अभियानाचे समन्वयक डॉ. जेरील बनाईत यांनी पत्रपरिषदेत दिली. भारतातील २२ प्रमुख शहरांसह आॅस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका आदी देशातील ११ शहरांमध्ये एकाचवेळी हा प्रोटेस्ट मार्च काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळच्या पांढरकवडा जंगलातील कथित नरभक्षक वाघिण अवनीची हत्या करण्यात आली असून तिला न्याय मिळावा, या मागणीसाठी रविवारी ग्लोबल पीस मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती या वैश्विक अभियानाचे समन्वयक डॉ. जेरील बनाईत यांनी पत्रपरिषदेत दिली. भारतातील २२ प्रमुख शहरांसह आॅस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका आदी देशातील ११ शहरांमध्ये एकाचवेळी हा प्रोटेस्ट मार्च काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरात दुपारी ४ वाजता महाराज बाग येथून संविधान चौकापर्यंत शांतिमार्च काढून तेथे अवनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालय आणि पर्यावरण न्यायाचे संपूर्ण उल्लंघन करून अवनीला मारण्यात आल्याचा आरोप डॉ. बनाईत यांनी केला. तिच्या मृत्यूमुळे तिचे दोन्ही बछडे उपासमारीने किंवा इतर प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावण्याची शक्यता त्यांनीही यावेळी व्यक्त केली. वनविभाग व यंत्रणांनी बेजबाबदारपणे ही शिकार केल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रपरिषदेला पीयूष आकरे, अभिषेक ठावरे, स्मिता रहाटे, सारंग अखाडे, स्वप्नील बोधाने, सुलेखा माहूरकर आदी उपस्थित होते.