जगातील स्थिर तापमान व्यवस्था धोक्यात, उर्जा साधनांमध्ये बदल आवश्यक, आयआयटी दिल्लीचे संचालक प्रा.रंगन बॅनर्जी यांचं मत

By योगेश पांडे | Published: October 4, 2024 10:15 PM2024-10-04T22:15:52+5:302024-10-04T22:16:57+5:30

Climate Change News: विविध क्षेत्रांमध्ये विकास होत असताना जगात कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमानाचा समतोल बिघडला आहे. होलोसीन युग म्हणजेच सुमारे अकरा हजार वर्षांपासून तापमान व्यवस्था एकसमान होती.

Global stable temperature system in danger, change in energy sources required, Director of IIT Delhi Prof. Rangan Banerjee | जगातील स्थिर तापमान व्यवस्था धोक्यात, उर्जा साधनांमध्ये बदल आवश्यक, आयआयटी दिल्लीचे संचालक प्रा.रंगन बॅनर्जी यांचं मत

जगातील स्थिर तापमान व्यवस्था धोक्यात, उर्जा साधनांमध्ये बदल आवश्यक, आयआयटी दिल्लीचे संचालक प्रा.रंगन बॅनर्जी यांचं मत

- योगेश पांडे 
नागपूर  - विविध क्षेत्रांमध्ये विकास होत असताना जगात कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमानाचा समतोल बिघडला आहे. होलोसीन युग म्हणजेच सुमारे अकरा हजार वर्षांपासून तापमान व्यवस्था एकसमान होती. मात्र आता जगातील स्थिर तापमान व्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे उर्जा साधनांमध्ये तत्काळ बदलांची आवश्यकता आहे, असे मत आयआयटी-दिल्लीचे संचालक प्रा.रंगन बॅनर्जी यांनी व्यक्त केले. शुक्रवारी ‘सीएसआयआर’चा ८३ वा स्थापना दिवस साजरा झाला. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

‘नीरी’च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला ‘नीरी’चे संचालक डॉ.अतुल वैद्य, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. भविष्यातील संकटांचा सामना करायचा असेल तर शाश्वत विकास उद्दीष्टे डोळ्यासमोर ठेवून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी कसे होईल यावर भर दिला गेला पाहिजे. त्यासाठी उर्जा प्रणालींमध्ये मोठ्या सुधारणा झाल्या पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आणि त्याचे सामाजिक तसेच आर्थिक परिणाम स्पष्टपणे समजून घेतले गेले पाहिजे. आपल्या वैज्ञानिक ज्ञानात अजूनही बरीच उणीवा आहेत. त्या दूर करून नवकल्पना प्रत्यक्षात आणायला हव्यात. वायू प्रदूषण, हवामान बदल आणि ऊर्जा प्रणालींचे सखोल विश्लेषण हे शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल, असे प्रा.बॅनर्जी म्हणाले. आयआयटी-दिल्ली व सीएसआयआर नीरी यांच्यात सोबत काम झाले पाहिजे असा मानस त्यांनी व्यक्त केला. डॉ.अतुल वैद्य यांनी ‘सीएसआयआर’च्या कामगिरीवर प्रकाश टाकला. समाज हितासाठी वैज्ञानिक उत्कृष्टता व तांत्रिक नवकल्पनांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

आज संतुलित वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे. मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकत्रितपणे वापर करून हवामान बदल आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापन यासारख्या समस्यांना तोंड देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. डॉ.देबिश्री खान यांनी संचालन केले तर प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले. यावेळी नीरीतील सेवानिवृत्त तसेच कार्याची २५ वर्षे पूर्ण करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच पर्यावरण पत्रिकाची ई आवृत्ती आणि ‘बांबू डायव्हर्सिटी इन इंडिया अँड इट्स रोल इन सरफेस इरोशन कंट्रोल’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. 'जिज्ञासा' उपक्रमांतर्गत आयोजित 'सूक्ष्म संशोधन प्रकल्प स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. ‘सीएसआयआर’च्या स्थापनादिवसानिमित्त नागपूर आणि विदर्भातील ५९ शाळा आणि महाविद्यालयातील अंदाजे ३,१३२ विद्यार्थ्यांनी संस्थेला भेट देऊन प्रकल्पांची पाहणी केली.

Web Title: Global stable temperature system in danger, change in energy sources required, Director of IIT Delhi Prof. Rangan Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.