जागतिक पातळीवर भारताचे भविष्य उज्ज्वल : उच्चायुक्त ए.एम.गोंडाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:16 PM2018-12-14T22:16:17+5:302018-12-14T22:19:20+5:30
२००८ साली भारताचा ‘जीडीपी’ हा फ्रान्सच्या निम्मा होता. मात्र त्यानंतरच्या दहा वर्षात भारताचा विकासदर उंचावला आहे. फ्रान्सच नव्हे तर इतरही अनेक देशांना मागे टाकत पहिल्या पाच देशात भारताचा समावेश झाला आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या तीन देशांमध्ये गणली जाईल, असे मत आॅस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाचे उच्चायुक्त डॉ.ए.एम.गोंडाणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी ‘भारताचे परराष्ट्र धोरण आणि भारतीय परराष्ट्र सेवा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २००८ साली भारताचा ‘जीडीपी’ हा फ्रान्सच्या निम्मा होता. मात्र त्यानंतरच्या दहा वर्षात भारताचा विकासदर उंचावला आहे. फ्रान्सच नव्हे तर इतरही अनेक देशांना मागे टाकत पहिल्या पाच देशात भारताचा समावेश झाला आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या तीन देशांमध्ये गणली जाईल, असे मत आॅस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाचे उच्चायुक्त डॉ.ए.एम.गोंडाणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी ‘भारताचे परराष्ट्र धोरण आणि भारतीय परराष्ट्र सेवा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले तसेच प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी उपस्थित होते. सद्यस्थितीत अमेरिका, चीन, जपान, जर्मनी यांची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे आहे. पुढील दोन वर्षात जर्मनी तर पाच वर्षांत जपानला भारत सहज मागे टाकेल, असे डॉ.ए.एम.गोंडाणे म्हणाले. स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया पं.जवाहरलाल नेहरू यांनी रचला. त्यानंतर वेळोवेळी परराष्ट्र धोरणात बदल होत गेला. देशातील स्थानिक परिस्थितींनुसार परराष्ट्र धोरण ठरत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थितीनुसार परराष्ट्र धोरणाची आखणी होते. सोबतच देशाच्या आवश्यकतेनुसार परराष्ट्र धोरणाची भूमिका घ्यावी लागते, असे त्यांनी सांगितले.
दूतावासात काम करत असताना राजदूतांना दोन देशांमधील राजकीय, आर्थिक तसेच सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावे यावर भर द्यावा लागतो. एखादा वाद असेल तर तोदेखील सामंजस्यानेच सोडविण्याची भूमिका असते. आजच्या घडीला जगातील विविध देशांमध्ये भारतीय मूळाचे तीन कोटींहून अधिक लोक राहत आहेत. अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे. हे भारतीय नागरिक देशाची खरी ताकद बनू शकतात, असे ते म्हणाले. डॉ. प्रमोद येवले यांनीदेखील यावेळी आपले मनोगत मांडले. तर डॉ. नीरज खटी यांनी आभार मानले.