भारतीयांच्या दृष्टीने गौरवाचा दिवस
By admin | Published: September 11, 2015 03:36 AM2015-09-11T03:36:36+5:302015-09-11T03:36:36+5:30
जपानमधील कोयासन विद्यापीठाच्या परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवल्याने यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
नागपूर : जपानमधील कोयासन विद्यापीठाच्या परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवल्याने यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. एकूणच भारतीयांच्या दृष्टीने हा गौरवाचा दिवस असून, हा अभूतपूर्व सोहळा आपल्याला प्रत्यक्षात अनुभवता आला, याचा विशेष आनंद आहे.
जपानमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला, ही मुळातच गौरवाची बाब असून या सोहळ्यात आपल्याला सहभागी होता आले, हा माझ्यासाठी गौरवाचा व आनंदाचा क्षण आहे, असे आंबेडकरी चळवळीतील तरुण कार्यकर्ते अमन कांबळे म्हणाले. या समारंभाकरिता नागपूरसह मुंबई, पंजाब, कोलकाता, चेन्नई, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स आदी ठिकाणांवरूनही मोठ्या संख्येने आंबेडकरवादी सहभागी झाले होते.
जपानमध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार होतो आहे. जपानी माणसाला बाबासाहेबांचे विचार प्रेरक वाटू लागले आहेत. आता खऱ्या अर्थाने दोन्ही देशांमध्ये बुद्धिजमच्या संदर्भात कार्य होईल, असेही ते म्हणाले. बाबासाहेबांना आता वैश्विक मान्यता मिळत आहे, त्याचे आम्ही साक्षी आहोत, ही आनंदाची बाब आहे.
कोलंबिया विद्यापीठानंतर जपानच्या कोयासनमध्ये बाबासाहेबांचा पुतळा असणे म्हणजे त्यांच्या विद्वत्तेला सलाम आहे, असे अमन कांबळे म्हणाले.
बानाईचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मेश्राम म्हणाले की, १२५ व्या जयंती समारोहनिमित्ताने जपानमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण हा निश्चितच ऐतिहासिक प्रसंग आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण अप्रतिम होते. त्यांनी बाबासाहेबांचा यथोचित गौरव केला.
या समारंभासाठी नागपूरमधून अलका मेश्राम, पी.एस. खोब्रागडे, वैशाली खोब्रागडे, डॉ. अलका ढोके यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीला मानाचा मुजरा
जपान येथील वाकायामा प्रांतातील कोयासन शहराच्या स्थापनेस १२०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने कोयासन विद्यापीठाने भारत आणि जपानच्या सांस्कृतिक वारसाचे आदानप्रदान करण्याचा निर्णय घेतला. कोयासन विद्यापीठातील संशोधन चमूवर याची जबाबदारी सोपविण्यात आली. कोयासन विद्यापीठाच्या रिसर्च टीमने संशोधनाअंती भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीला सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा मानले. यानंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारशी संपर्क साधण्यात आला. त्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा कोयासन विद्यापीठ परिसरात स्थापित करण्याचा निर्णय घेतला. बाबासाहेबांचा पुतळा उभारणे आणि संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे डॉ. सुशांत गोडघाटे यांची महत्त्वाची भूमिका राहिली.