यकृताशी संबंधित आजारांवर ‘ग्लायकाेथेरेपी’ अचूक निदान करेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2023 08:35 PM2023-01-07T20:35:31+5:302023-01-07T20:36:01+5:30
Nagpur News संशाेधकांनी यकृताशी संबंधित वेगवेगळ्या आजाराचे अचूक निदान करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे व लवकरच ते बाजारात उपलब्ध हाेईल, अशी माहिती वेस्ट बंगाल तंत्रज्ञान संस्थेच्या नैसर्गिक विज्ञान विभागाचे प्रा. डाॅ. विष्णू पाडा चटर्जी यांनी दिली.
नागपूर : अत्याधिक मद्यपान, अयाेग्य जीवनशैली, प्रदूषण आदींच्या कारणांमुळे यकृताशी संबंधित हिपॅटिटीस-बी, सिराेसिस व त्यापुढे लिव्हर कॅन्सरचा धाेका प्रचंड वाढला आहे. संशाेधकांनी यकृताशी संबंधित वेगवेगळ्या आजाराचे अचूक निदान करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे व लवकरच ते बाजारात उपलब्ध हाेईल, अशी माहिती वेस्ट बंगाल तंत्रज्ञान संस्थेच्या नैसर्गिक विज्ञान विभागाचे प्रा. डाॅ. विष्णू पाडा चटर्जी यांनी दिली.
नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या १०८ व्या इंडियन सायन्स काॅंग्रेसमध्ये ‘कॅन्सर आणि यकृताशी संबंधित आजारावर ग्लायकाेथेरेपी उपचार’ विषयावर झालेल्या चर्चासत्रात डाॅ. चटर्जी बाेलत हाेते. जगाची २ टक्के लाेकसंख्या आणि भारतात २५ लाख लाेक हिपॅटिटीस-बी आजाराने प्रभावित आहेत व दरवर्षी १ लाख लाेकांची भर पडते. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण गंभीर सिराेसिस आणि पुढे कॅन्सरच्या स्तरावर जाणे निश्चित आणि काही महिन्यांत रुग्ण मृत्यूच्या दारात पाेहचताे. यकृताशी संबंधित आजारांचे अचूक निदान करण्यासाठी एक ‘डायग्नाेस्टिक चाचणी’ विकसित केली आहे. ज्याद्वारे रक्ताच्या नमुन्यांमधून यकृताचे आजार शाेधणे शक्य हाेईल. ही चाचणी स्वस्त आणि चांगली आहे. येत्या काळात या चाचणीद्वारे हिपॅटिटीस-बी सारख्या आजारांचे वेळेपूर्वी निदान लावण्यात मदत हाेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यूएसएच्या मेरिलॅंड विद्यापीठाच्या बाॅयाेटेक्नाॅलाॅजी सेंटरचेप्रमुख डाॅ. हाफीज अहमद यांनी कर्करोग, फायब्रोसिस आणि मधुमेह अशा दीर्घकाळ त्रास देणाऱ्या आजारांवरील उपचारासाठी ‘ग्लायकोपेप्टाइड’ औषध विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती दिली. जीएम-१०१ नावाचे हे औषध विषाणूची वाढ आणि प्रसार राेखते, जगण्याची क्षमता वाढविते आणि शरीरात ट्यूमरविराेधी प्रतिसाद वाढविते. यूएसएच्या प्युर्टाेरिकाे विद्यापीठाचे बाॅयाेकेमिस्ट्री विभागाचे प्रा. दीपक बॅनर्जी यांनी ब्रेस्ट कर्कराेगाच्या गंभीरतेवर प्रकाश टाकत ‘ग्लायकाेथेरेपी’ उपचार पद्धतीबाबत माहिती दिली. २०२२ साली स्तन कर्कराेगाने ६ लाखांवर रुग्णांचे मृत्यू झाले व २०४० पर्यंत हा आकडा १० लाखांवर पाेहचेल. ‘ट्यूनिकामाससिन’ औषधाच्या उंदरावर केलेल्या अभ्यासात कर्कराेग गाठीच्या वाढीवर लक्षणीय प्रतिबंध घातल्याचा दावा त्यांनी केला. जापानच्या याेकाेहामा सिटी युनिव्हर्सिटीचे प्रा. यासुहिराे ओझेकी यांनी कर्कराेगावरील अद्ययावत ‘लेक्टीन’ थेरेपीची माहिती दिली. डाॅ. पायल ठवरे यांनी आभार मानले.