नागपुरात जीएमसी कॅन्सर सेंटरचे बांधकाम दीड महिन्यात : नकाशाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:08 AM2020-01-04T00:08:26+5:302020-01-04T00:09:06+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बहुप्रतिक्षित कॅन्सर हॉस्पिटलचा प्रश्न विधिमंडळात चर्चेला आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली आहे.

GMC Cancer Center to be constructed in Nagpur in a month and a half: map approved | नागपुरात जीएमसी कॅन्सर सेंटरचे बांधकाम दीड महिन्यात : नकाशाला मंजुरी

नागपुरात जीएमसी कॅन्सर सेंटरचे बांधकाम दीड महिन्यात : नकाशाला मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देरेडिएशन, सर्जिकल, पेडियाट्रिक, मेडिसीन ऑन्कोलॉजी विभागाचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बहुप्रतिक्षित कॅन्सर हॉस्पिटलचा प्रश्न विधिमंडळात चर्चेला आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली आहे. हॉस्पिटल बांधकामाच्या प्राथमिक नकाशाला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यातील २० कोटींचा निधी उपलब्ध झाल्यास पुढील दीड महिन्यात बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
तोंडाचा कॅन्सरमध्ये विदर्भ राजधानी ठरू पाहत आहे. शिवाय स्तन, गर्भाशय, फुफ्फुस व अन्ननलिकेचा कॅन्सरचे रुग्ण वाढले आहेत. याची दखल घेऊन राज्याने नागपूर मेडिकलमधील रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करून ‘कॅन्सर हॉस्पिटल’ला मंजुरी दिली. इमारतीच्या बांधकामासाठी ७६ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांना प्रशासकीय मंजुरीही मिळाली. पूर्वी हे बांधकाम नागपूर सुधार प्रन्यास करणार होते. आता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत केले जाणार आहे. बांधकामाला घेऊन हा प्रकल्प रखडत चालला असताना हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा झाल्याने गती आली. तळमजल्यासह तीन मजल्याच्या इमारतीच्या बांधकामाच्या नकाशाला नुकतीच मंजुरी मिळाली. यामुळे आता महिन्याभरात अंदाजपत्रक तयार होण्याची शक्यता आहे. या दरम्यान बांधकामाला महानगरपालिकेची व अग्निशमन दलाची मंजुरी मिळाल्यास व ७६ कोटींमधून २० कोटींचा पहिला हप्ता खात्यात जमा झाल्यास येत्या दीड महिन्यात बांधकामाची निविदा काढून बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

टीबी वॉर्डच्या परिसरात बांधकाम
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सांगितले, मेडिकलमध्ये होऊ घातलेल्या ‘कॅन्सर हॉस्पिटल’ला ‘जीएमएसी कॅन्सर सेंटर’ असे नाव देण्यात आले आहे. हे सेंटर टीबी वॉर्डच्या परिसरात दीड लाख स्क्वेअर फूटमध्ये प्रस्तावित आहे. तळमजल्यासह तीन मजल्याच्या या इमारतीत पुढे दोन मजले वाढविले जाणार आहे. या ‘सेंटर’मध्ये विविध प्रकारच्या कर्करोगावर अद्ययावत उपचार उपलब्ध करून दिला जाईल. या सेंटरमध्ये सर्वच प्रकारच्या कर्करोगावर उपचाराची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

असे असणार कॅन्सर सेंटर
तळमजल्यावर रेडिओथेरपी विभागासह, न्युक्लिअर मेडिसीन, देखभाल कक्ष व इतरही विभाग असणार आहे. पहिल्या मजल्यावर रेडिएशन ऑन्कोलॉजी, मेडिसीन ऑन्कोलॉजी, सर्जरी ऑन्कोलॉजी, पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी विभागाचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व ‘डे-केअर’ सेंटर असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर सात वॉर्ड असतील. या शिवाय, ‘डीलक्स रुम’, निवासी डॉक्टरांच्या खोल्या असतील. तिसऱ्या मजल्यावर चार शस्त्रक्रिया गृह, ‘मेडिसीन आयसीयू’ व ‘सर्जिकल आयसीयू’ असणार आहे.

‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’साठी स्वतंत्र विभाग
‘जीएमसी कॅन्सर सेंटर’मध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजी, मेडिसीन ऑन्कोलॉजी, सर्जरी ऑन्कोलॉजी, पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी’ विभाग असेल. महत्त्वाचे म्हणजे, ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ ची सोयही उपलब्ध असणार आहे. सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर याचे स्वतंत्र युनिट असणार आहे.
डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: GMC Cancer Center to be constructed in Nagpur in a month and a half: map approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.