नागपुरात गो एअरची दोन उड्डाणे अचानक रद्द : आमदारांची असुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:18 PM2019-12-21T23:18:37+5:302019-12-21T23:20:18+5:30
गो एअरचे मुंबईला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण अचानक रद्द करण्यात आले. त्यामुळे आमदारांना काही काळ विमानतळावरच अडकून राहावे लागले. याशिवाय गो एअरचे दिल्ली उड्डाणही रद्द करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत आयोजित हिवाळी अधिवेशनाचा समारोप शनिवारी झाल्यानंतर मुंबईला परत जाण्यासाठी विमानतळावर आलेल्या काही आमदारांना समस्यांचा सामना करावा लागला. गो एअरचे मुंबईला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण अचानक रद्द करण्यात आले. त्यामुळे आमदारांना काही काळ विमानतळावरच अडकून राहावे लागले. याशिवाय गो एअरचे दिल्ली उड्डाणही रद्द करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास मुंबई विमानासाठी पोहोचलेल्या काही आमदारांची गो एअरचे जी८-२६०२ नागपूर-मुंबई विमान रद्द झाल्याचे कळताच निराशा झाली. त्यांना एअरलाईन्सने तिकिटाचे पैसे परत केले आणि दुसऱ्या एअरलाईन्सच्या विमानात सीट उपलब्ध करून दिली. एअरलाईन्सने उड्डाण रद्द झाल्याचे कारण ऑपरेशनल असल्याचे सांगितले आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या वैमानिकाने ‘सिक’ रिपोर्ट अर्थात आजारी असल्याची तक्रार केली होती. गो एअरची रात्री ८.३० चे जी८- २५१९ दिल्ली-नागपूर विमान पोहोचले नाही. या कारणामुळे जी८-२५२० विमान नागपुरातून दिल्लीला रवाना झाले नाही.