ऑफिसमधून गेले थेट लग्नाला, १८ कर्मचाऱ्यांच्या मागे लागले ‘फटाके’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2023 08:45 PM2023-05-03T20:45:58+5:302023-05-03T20:51:03+5:30
Nagpur News कार्यालयीन वेळेत विभागातील अधिकाऱ्यांच्या एका लग्नसमारंभात जाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना भोवणार आहे.
नागपूर : कार्यालयीन वेळेत विभागातील अधिकाऱ्यांच्या एका लग्नसमारंभात जाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना भोवणार आहे. कार्यालयात अनुपस्थित असलेल्या १८ जणांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार यांनी बुधवारी कारणे द्या, नोटीस बजावली आहे.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत व शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे यांनी मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास शिक्षण विभागाच्या कार्यालयाला अकस्मात भेट दिली. विभागातील २८ पैकी तब्बल १८ कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. गैरहजर कर्मचारी व अधिकारी एका लग्नसमारंभाला गेल्याची माहिती मिळाली. ड्युटीवर असताना वरिष्ठांची परवानगी न घेता एकाच वेळी कार्यालयातील ७५ टक्के कर्मचारी खासगी कार्यक्रमासाठी गेल्याने कार्यालयात शुकशुकाट होता. याची दखल घेत कुंदा राऊत यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव यांना संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे द्या, नोटीस बजावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी गैरहजर असलेल्या १८ जणांना नोटीस बजावली आहे.
प्रशासकीय कारवाई करणार
वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता कार्यालयात गैरहजर असल्याप्रकरणी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९६७ अंतर्गत नियम ३ चा भंग केल्याने प्रशासकीय कारवाई का करू नये, अशी विचारणा बजावलेल्या नोटीसमधून करण्यात आली आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी गैरहजर असल्याने हे प्रकरण त्यांच्या अंगलट येणार आहे.
...