दररोज १०० किमी रस्ता बांधकामाचे लक्ष्य

By admin | Published: October 25, 2015 02:45 AM2015-10-25T02:45:21+5:302015-10-25T02:45:21+5:30

रस्ते विकासातून आपल्याला देशाचा विकास साधायचा आहे. यापूर्वी देशात दररोज तीन ते चार किलोमीटर रस्ता बांधल्या जात होता.

The goal of 100 km road construction every day | दररोज १०० किमी रस्ता बांधकामाचे लक्ष्य

दररोज १०० किमी रस्ता बांधकामाचे लक्ष्य

Next

नितीन गडकरी : मनसर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन
नागपूर : रस्ते विकासातून आपल्याला देशाचा विकास साधायचा आहे. यापूर्वी देशात दररोज तीन ते चार किलोमीटर रस्ता बांधल्या जात होता. आपल्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय आल्यानंतर या कामाची गती वाढवून प्रति दिवस १८ किमी पर्यंत आली आहे. लवकरच यात आणखी सुधारणा होऊन देशात दररोज किमान ३० किमीचा रस्ता तयार होईल. मात्र एवढ्यावर आपण थांबणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दररोज १०० किमी लांबीचे रस्ते बांधण्याचे अंतर्गत लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्या दिशेने काम सुरू आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेपासून मनसरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ च्या चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन रामटेक टी- जंक्शनच्या जवळ मनसर येथे शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर होते. या वेळी गडकरी म्हणाले, आज भूमिपूजन होत असलेल्या याच मनसर खवासा मार्गावर आपला अपघात झाला होता. देशात वर्षभरात पाच लाख अपघात होतात. यापैकी तीन लाख अपघातात हातपाय निकामी होतात तर दीड लाख मृत्यू होतात. रस्त्यांच्या बांधकामात राहणाऱ्या तांत्रिक चुका, केली जाणारी तडजोड या अपघातांसाठी जबाबदार असतात. त्यामुळे येत्या काळात महामार्गांची स्थिती सुधारून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण मंत्री झालो ते ३ लाख ८० हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे वन विभाग, पर्यावरण विभाग, रेल्वे विभाग आदींच्या मंजुरीसाठी अडली होती. यापैकी ३ लाख ४० हजार कोेटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. गडकरी म्हणाले, येत्या पाच वर्षात राष्ट्रीय महामार्गाची पाच लाख कोटींची कामे केली जातील. राष्ट्रीय महामार्ग हे पर्यावरणपूरक करण्यासाठी रस्त्याच्या प्रत्येक मंजूर कामाच्या निधीतून एक टक्का रक्कम राखून ठेवण्यात येईल.
या निधीतून राष्ट्रीय महामार्ग बांधतांना वृक्षांचे पुनर्रोपण, नवीन वृक्षारोपण तसेच सौंदर्यकरण व देखभालीसाठी खर्च करण्यात येईल व यातून ग्रीन हायवे संकल्पना राबविण्यात येईल. महामार्गासाठी एक झाड तोडले तर पाच झाडे लावून ती जगविण्याची जबाबदारी घेतली जाईल असे सांगून आम्हीही पर्यावरणाप्रति संवेदनशील आहोत, असा टोला त्यांनी प्रकल्प अडविणाऱ्यांना लगावला. मनसर ते खवासा हा चौपदरी ४६ किलोमीटर मार्ग पर्यावरणाच्या रक्षणासोबत बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणारा ठरेल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यास त्यांना ताबडतोब वीज कनेक्शन देण्यात येईल, तसेच आदिवासी शेतकऱ्यांनी सोलर पंपाची मागणी केल्यास त्वरित पंप पुरविले जातील, असे सांगितले. (प्रतिनिधी)

दुपदरी महामार्ग चौपदरी करणार : जावडेकर
वनातून जाणाऱ्या महामार्गाच्या रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्ते घेण्यास वनविभागाच्या यापूर्वीच्या जाचक अटी रद्द करुन आता धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.यापुढे पर्यावरणाचे संतुलन व प्राण्यांच्या संरक्षणाचा विचार करून रस्त्यांचा विकास केला जाईल. ज्या ठिकाणी दोन पदरी राष्ट्रीय महामार्ग आहेत त्या ठिकाणी चारपदरी राष्ट्रीय महामार्ग तयार केले जातील. यामुळे विकासाला चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. मनसर - खवासा महामार्गासाठी निधीसह सर्वकाही उपलब्ध होते. मात्र, वनखात्याची परवानगी मिळत नव्हती. आपण यातील अडथळे दूर केले व आता कामाला सुरुवात होत आहे. पर्यावरण विभागामुळे अडलेले रस्ते, जलवाहिनी, महापारेषणही वीज वाहिनी आदी सर्व कामांना मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगत हाच खरा विकासाचा मार्ग असल्याचे ते म्हणाले. निसर्गाचे संवर्धन व विकास या दोन्ही गोष्टींसाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The goal of 100 km road construction every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.