तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य
By Admin | Published: June 29, 2016 03:02 AM2016-06-29T03:02:23+5:302016-06-29T03:02:23+5:30
राष्ट्रीय वन धोरणानुसार राज्यात किमान ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र असणे अपेक्षित आहे.
लोकसहभाग हवा : १ जुलैसाठी वन विभाग सज्ज
जीवन रामावत नागपूर
राष्ट्रीय वन धोरणानुसार राज्यात किमान ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र असणे अपेक्षित आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात केवळ २० टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. शिवाय यापैकी केवळ १६ टक्के क्षेत्रावरच घनदाट जंगल असून, इतर चार टक्के हा विरळ आहे. त्यामुळे या चार टक्के क्षेत्रावरील जंगल अधिक घनदाट करून, राज्यातील वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी हा दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र वन विभाग येथेच थांबणार नसून, पुढील तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) सर्जन भगत यांनी सांगितले.
येत्या १ जुलै रोजी राज्यभरात एकाच दिवशी दोन कोटी रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने मंगळवारी पीसीसीएफ भगत यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. भगत म्हणाले, एवढी मोठी वृक्ष लागवड केवळ वन विभाग करू शकत नाही. त्यामुळे यात लोकसहभाग आवश्यक आहे. वन विभाग आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवर्षी चार ते पाच कोटी वृक्ष लागवड करीत असतो. परंतु आता या कामात लोकसहभाग घेतला जाणार आहे. शिवाय ज्या जमिनीवरील वृक्ष कटाई करण्यात आली, अशाही लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे.
या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात वन विभागाने १ कोटी ५० लाख वृक्ष लागवडीची जबाबदारी स्वीकारली आहे. शिवाय उर्वरित ५० लाख वृक्ष लागवड ही विविध शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासंबंधी राज्य शासनाने मागील ३१ मार्च रोजी एक अध्यादेश जारी केला होता. त्यानुसार सर्वांची जबाबदारी निश्चित केली आहे. वन विभागाशिवाय इतर विभागांची जबाबदारी ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी बैठका घेऊन, सर्वांना अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन केले आहे. ही संपूर्ण मोहीम अत्यंत नियोजनबद्धरीत्या राबविली जात असल्याचेही यावेळी भगत यांनी सांगितले.
खासगी संस्थांचा विशेष सहभाग
ही मोहीम सामान्य लोकांपर्यंत कशी पोहोचेल, यासाठी स्वतंत्र नियोजन करून प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. यातून लोकांना या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. वन विभागाच्या या आवाहनाला प्रचंड प्रतिसादसुद्धा मिळत आहे. अनेक खासगी व स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यामुळे या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात वनविभाग आणि शासकीय विभागांसह खासगी संस्थांचाही मोठा सहभाग राहणार असल्याचे पीसीसीएफ भगत म्हणाले.
तीन कोटी वृक्ष लागवडीची नोंदणी
१ जुलैच्या दोन कोटी वृक्ष लागवडीसाठी वन विभाग पूर्णत: सज्ज झाला आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी २५ जूनपर्यंत आॅनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. शिवाय आता पुढील ३० जूनपर्यंत आॅफलाईन सुविधा सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे, दोन कोटी वृृक्ष लागवडीसाठी मागील २५ जूनपर्यंत तब्बल तीन कोटी वृक्ष लागवडीची नोंदणी झाली असल्याचे भगत यांनी सांगितले. तसेच राज्यभरात तीन कोटी एक लाख खड्डे खोदून तयार असल्याचेही ते म्हणाले. यात दोन कोटी स्वत: वन विभाग लागवड करणार असून, ५० लाख इतर शासकीय यंत्रणा आणि उर्वरित ५० लाख खासगी व स्वयंसेवी संस्था वृक्ष लागवड करणार आहेत.