ईश्वरही आता राजकारणातला कार्यकर्ता झालाय! सुरेश द्वादशीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 09:45 PM2019-12-27T21:45:18+5:302019-12-27T21:49:15+5:30
छत्रपती शिवाजी महाराज फार पूर्वी हिंदू महासभेचे असल्याचे वाटत होते. नंतर, यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये नेले. पुढे पक्षांतर करून महाराज शिवसेनेचे झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज फार पूर्वी हिंदू महासभेचे असल्याचे वाटत होते. नंतर, यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये नेले. पुढे पक्षांतर करून महाराज शिवसेनेचे झाले आणि आता ते नेमके कोणत्या पक्षात आहेत, असा प्रश्न पडत असल्याची राजकीय कोटी करत ज्येष्ठ साहित्यिक व लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी राजकारणाचे विश्लेषण केले. राजकारणात धर्म आल्यापासून ईश्वरही राजकारणातला कार्यकर्ता झाला असावा, असा पक्का समज झाल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंद्राच्या वतीने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात द्वादशिवार यांच्या दहादिवसीय युगांतर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी त्यांनी ‘राजकारण’ या विषयावर व्याख्यानाचे पुष्प गुंफले.
महात्मा गांधी आणि कौटिल्याने राजकारणावर केलेल्या व्याख्या सांगतानाच, त्यावरील विश्लेषण द्वादशीवार यांनी यावेळी केले. महात्मा गांधी यांनी ईश्वराच्या उपासनेचा प्रमुख मार्ग म्हणून राजकारणाचा मार्ग निवडला होता. तर, कौटिल्याने राजनिती व लोकनिती असे दोन विभाग करत राजसत्तेसाठी राजकारण असल्याचे सांगितले होते. राजकारणात सत्तास्थापित करताना अबाधित ठेवण्यासाठी व विस्तारित करण्यासाठी जो आडवा येईल, त्याला ठेचण्याचा उपदेश केला. या दोन मार्गापैकी वर्तमानातील राजनेते कौटिल्याचीच उपासना करत असल्याची टिका द्वादशिवार यांनी यावेळी केली. नेहरूंपर्यंत राजकारण महात्मा गाधी यांच्या अध्यात्मावर चालत होते. नंतर मात्र सत्तेचे सामूहिक राजकारणात रूपांतरण झाले. वर्तमानात पुन्हा एकदा सत्ता एकहाती आली तरी त्यांचे केंद्र स्वार्थात असल्याचे ते म्हणाले. राजकारणाचे एक एक पैलू उलगडताना त्यांनी अनेक गोष्टींवर प्रहारही केले. एकेकाळी रस्त्यावर असलेला नेता नंतर शेकडो-हजारो कोटींचा मालक होतो.
कोणताही उद्योग-व्यवसाय नसताना हे कसे शक्य होते? ७८ हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार असलेला नेता एका रात्रीत पक्षांतर करताच शुद्ध होतो, त्याला उपमुख्यमंत्रीही बनविले जाते आणि तो पुन्हा माहेरी परतल्यावर त्याच्या घोटाळ्याचे पुनरूज्जीविकरण कसे करायचे, यावर चर्चा सुरू होते. कोणता खासदार कोणाच्या पे रोलवर संसदेत पोहोचतो, गोरदेजला २६ हजार कोटीचे कंत्राट दिले नाही म्हणून मुख्यमंत्र्यावर दिल्ली राग का करते, क्रिकेट बोर्डावर राजकीय नेते शरद पवार, लालू प्रसाद यादव कशासाठी असे अनेक प्रश्न उपस्थित करत प्रा. सुरेश द्वादशिवार यांनी राजकारणाचे अनेक चांगले व मलिन पैलू उपस्थितांसमोर उलगडले. संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. स्वागत श्रीराम काळे यांनी केले.