देवांनाही चोरट्यांचे ‘विघ्न’
By admin | Published: April 19, 2015 02:17 AM2015-04-19T02:17:35+5:302015-04-19T02:17:35+5:30
गोरगरीब, सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच नेत्यांचे नातेवाईक अशा सर्वच स्तरातील नागरिकांना हैराण केल्यानंतर चोरट्यांनी आता देवाकडे मोर्चा वळविला आहे.
नागपूर : गोरगरीब, सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच नेत्यांचे नातेवाईक अशा सर्वच स्तरातील नागरिकांना हैराण केल्यानंतर चोरट्यांनी आता देवाकडे मोर्चा वळविला आहे. सावरकर नगरातील हनुमान मंदिराची कुलूपं फोडून चोरट्यांनी दानपेटीतून रक्कम लंपास केली. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली.
देवनगर चौकानजिकच्या सावरकर नगरात श्री हनुमान मंदिर आहे. १९७० ला या मंदिराची स्थापना झाली. मंदिराच्या सभागृहात पहाटे योगाभ्यास वर्गही भरतो. नेहमीप्रमाणे आज सकाळी ५.४५ ला योगाभ्यासी आत्माराम हटवार मंदिराचे दार उघडण्यासाठी आले. समोरच्या चॅनल गेटचे कुलूप तुटून दिसल्यामुळे त्यांनी मंदिराच्या बाजूलाच राहाणारे भाऊराम बिजेवार यांना कळविले. त्यांनी आजूबाजूची मंडळी तसेच पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. काही वेळेतच मंदिरासमोर विश्वस्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय दिवाणजी, सहसचिव प्रवीण डोळस आले. परिसरातील भाविकांनीही गर्दी केली. चोरट्यांनी चॅनल गेट तसेच मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि भिंतीच्या आतमधील बाजूला बसविलेल्या दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रक्कम पळविली. याबाबत धंतोली पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांचा ताफाही मंदिरात पोहचला.
चोरट्यांनी दानपेटीतून किती रक्कम पळविली, ते स्पष्ट झाले नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी दानपेटी उघडण्यात आली होती.
तेव्हापासून मंदिरात येणाऱ्या भाविकांनी किती रक्कम दान केली, ते सांगता येणार नसल्याचे हटवार म्हणाले. दरम्यान, या चोरीसोबतच चोरट्यांनी बाजूच्या एका लॉन्ड्रीवाल्याचे कपडे हुसकावून रोख शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे चौकातील भेळपुरीवाल्याचाही हातठेला फोडून चोरी केली. (प्रतिनिधी)