आठवड्यात दरवाढ : सोने १,४०० तर चांदीत १,८०० रुपयांची चकाकले !
By मोरेश्वर मानापुरे | Published: March 3, 2024 08:26 PM2024-03-03T20:26:09+5:302024-03-03T20:26:31+5:30
सोने ६३,९०० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर
नागपूर: आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध घडामोडींमुळे यावर्षी सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला. शनिवार, २ मार्च रोजी नागपुरात दहा ग्रॅम शुद्ध सोने ६३,९०० रुपये आणि प्रति किलो चांदीचे दर ७१,६०० रुपयांवर पोहोचले. आठवड्यातील चढउतारामुळे सोने १,४०० रुपये आणि चांदीत तब्बल १,८०० रुपयांची वाढ झाली. यंदा सोने ७० हजार रुपयांवर जाण्याची अपेक्षा आहे. मात्र, किमतीतील अस्थिरतेमुळे विक्रीवर परिणाम झालेला नाही.
गेल्यावर्षी १६ टक्के परतावा
भारतातील गुंतवणुकदारांमध्ये सोन्याचे आकर्षण वाढले आहे. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून लोक वापरासाठीही खरेदी करतात. त्यामुळे मुख्य प्रवाहात सोन्याची मागणी आहे. सोन्याचे मूल्य कमी झाल्याचे कधीही दिसत नाही. गतवर्षात सोन्याने १६ टक्के परतावा दिला. सोने-चांदी या मौल्यवान धातूंवर ३ टक्के जीएसटी आणि दागिन्यांवर १२ ते २० टक्क्यांपर्यंत मेकिंग शुल्क आकारण्यात येते. या दोन्ही कारणांमुळे खरेदीवेळी सोने-चांदीच्या मूळ किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते.
अशी झाली चढउतार
शनिवार, २४ फेब्रुवारीला सोने ६२,६०० आणि चांदीचे ७०,९०० रुपये भाव होते. सोमवार, २६ मार्चला खुलत्या बाजारात सोने स्थिर तर चांदीच्या भावात ३०० रुपयांची घसरण झाली. मंगळवारी सोने पुन्हा स्थिर तर चांदीत ८०० रुपयांची घसरण होऊन भाव ६९,८०० रुपयांपर्यंत कमी झाले. मात्र, बुधवार, २८ रोजी सोने १०० रुपयांनी कमी झाले तर चांदीत ६०० रुपयांची वाढ झाली. गुरुवार, २९ फेब्रुवारीला सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात सोने ६२,९०० रुपयांवर स्थिर, तर चांदीत ३०० रुपयांची वाढ होऊन भाव ७१,२०० रुपयांवर पोहोचले. १ मार्चला सकाळ आणि दुपारच्या सत्रात सोने ६२,९०० रुपयांवर स्थिर होते. तर सायंकाळच्या सत्रात अचानक ३०० रुपयांची वाढ होऊन भाव ६३ हजारांपुढे ६३,२०० रुपयांवर गेले. मात्र, चांदीचे दर ७०,७०० रुपयांपर्यंत कमी झाले. शनिवार, २ मार्चला बाजार बंद होताना सोने ७०० रुपयांनी वाढून ६३,९०० आणि चांदीचे भाव ९०० रुपयांची वाढून ७१,६०० रुपयांवर पोहोचले. आठवड्यातील घडामोडीनुसार सोने १,४०० आणि चांदीत १,८०० रुपयांची वाढ झाली.
सोने-चांदीच्या दरवाढीचा तक्ता :
दिनांक सोने चांदी
२४ फेब्रु. ६२,६०० ७०,९००
२६ फेब्रु. ६२,६०० ७०,६००
२७ फेब्रु. ६२,६०० ६९,८००
२८ फेब्रु. ६२,५०० ७०,४००
२९ फेब्रु. ६२,९०० ७१,२००
१ मार्च ६३,२०० ७०,७००
२ मार्च ६३,९०० ७१,६००
(दरावर ३ टक्के जीएसटी वेगळा)