सोने २५ हजारांकडे!

By admin | Published: July 19, 2015 03:00 AM2015-07-19T03:00:19+5:302015-07-19T03:00:19+5:30

वर्षभरात सोन्याच्या किमतीत तब्बल २ हजार रुपयांची घसरण झाली असून शनिवारी २६,१५० हजारांवर स्थिरावलेले भाव पुढील सणासुदीत २५ हजारांपर्यंत खाली ...

Gold is 25 thousand! | सोने २५ हजारांकडे!

सोने २५ हजारांकडे!

Next

गुंतवणुकीची संधी : तीन वर्षांत २७ टक्के घसरण
मोरेश्वर मानापुरे नागपूर
वर्षभरात सोन्याच्या किमतीत तब्बल २ हजार रुपयांची घसरण झाली असून शनिवारी २६,१५० हजारांवर स्थिरावलेले भाव पुढील सणासुदीत २५ हजारांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
तीन वर्षांत सोन्यात २७ टक्के तर वर्षभरात १२ टक्क्यांची घसरण झाली. जागतिक बाजारात सोन्याने नीचांक गाठला आहे. घरगुती बाजारातही सोने ३० टक्क्यांनी घसरले आहे. हीच खरी गुंतवणुकीची वेळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक बाजारात मागणी मंदावली
जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत दरदिवशी दिसून येत आहे. भाव आणखी कमी होतील, या अपेक्षेने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडून फारशी मागणी नाही. सणासुदीतही घसरणीची अपेक्षा आहे. स्थानिक बाजारात आठवड्यात १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव १७५ रुपयांनी खाली उतरून भावपातळी २६,२७५ रुपयांवर स्थिरावली. सोन्याप्रमाणेच चांदीतही चांगलीच घसरण झाली आणि चार महिन्यांच्या नीचांकावर आली. जागतिक बाजारात असलेली विषम परिस्थिती आणि स्थानिक बाजारपेठेत खरेदीदार नसल्याने सोन्याच्या मागणीत घट झाल्याची प्रतिक्रिया सराफा बाजाराचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी घडामोडींचे विश्लेषण करताना सांगितले.
वायदा बाजारात नफाखोरी
वायदा बाजारात नफेखोरीमुळे सोन्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठ बहुतांश जागतिक बाजारपेठ आणि वायदे बाजारावर अवलंबून असते. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या भावात घसरण झाली. शेअर बाजार, जागतिक घडामोडी आणि डॉलरच्या किमतीचा परिणाम देशांतर्गत सोन्याच्या बाजारावर पडत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आठवड्यातही घसरण
चालू आठवड्यात सहाही दिवस सोन्यात घसरण झाली. स्थानिक सराफा बाजारात सोमवारी १० ग्रॅम शुद्ध सोने १५ रुपयांनी घसरले. मंगळवारी भाव ३५ रुपयांनी कमी होऊन २६,४०० रुपयांपर्यंत खाली आला. आंतरराष्ट्रीय घडामोडीनुसार बुधवारी सोने ६५ रुपयांनी घसरून २६,३६५ रुपयांवर पोहोचले. सोन्यात सुरू असलेली घसरण गुरुवार, १६ जुलैला सुरूच होती. यादिवशी शुद्ध सोने ६५ रुपयांनी उतरले. शुक्रवारीही २५ रुपयांनी भाव कमी होऊन २६,२७५ रुपयांत विक्री झाली. शनिवारी बाजार बंद होतेवेळी सोने १२५ रुपयांनी कमी झाले. त्यादिवशी २४ कॅरेट सोन्याचे भाव २६,१५० रुपये, २३ कॅरेट २५,९०० आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव २५,६५० रुपयांवर पोहोचले. सोने २५ हजारांपर्यंत खाली उतरण्याच्या वृत्ताने ग्राहकांनी खरेदी थांबविली आहे. सध्या खरेदी करता येईल, एवढी पातळी सोन्याने ओलांडली आहे. ग्राहकांनी पुन्हा वाट पाहू नये, असे सराफांनी सांगितले.
सोन्यात गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह
सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचा विचार नेहमीच केला जातो. पण गेल्या काही वर्षांत निरंतर होणारी घट गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सध्या ग्राहक सोने खरेदी आवश्यतेवेळीच करीत आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था बळकट होत असल्याने भाव आणखी कमी होऊ शकतात, असे अर्थतज्ज्ञ म्हणाले.

Web Title: Gold is 25 thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.