नवरात्रोत्सवात सोने-चांदी अधिक चकाकणार; सर्वाधिक विकले जातात २२ कॅरेटचे दागिने 

By मोरेश्वर मानापुरे | Published: October 11, 2023 07:53 PM2023-10-11T19:53:30+5:302023-10-11T19:57:45+5:30

पितृपक्षात खाली आलेले सोन्याचे भाव आता वाढू लागले आहेत.

Gold and silver will shine more during Navratri festival 22 carat jewelery is the most sold | नवरात्रोत्सवात सोने-चांदी अधिक चकाकणार; सर्वाधिक विकले जातात २२ कॅरेटचे दागिने 

नवरात्रोत्सवात सोने-चांदी अधिक चकाकणार; सर्वाधिक विकले जातात २२ कॅरेटचे दागिने 

नागपूर: पितृपक्षात खाली आलेले सोन्याचे भाव आता वाढू लागले आहेत. त्यामागे हमास व इस्राईल यांच्यातील युद्धाचे कारण समजले जात आहे. युद्धामुळे भारतात दोन्ही मौल्यवान धातू सोने आणि चांदीचे भाव वाढू लागले आहेत. नवरात्रोत्सवात सोने आणि चांदी अधिक चकाकणार आहे. 

३ टक्के जीएसटीसह सोने ६० हजारांवर
जून महिन्यात ६३ हजारांपर्यंत गेलेले सोन्याचे दर काही दिवसांआधी ५७,३०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर पुन्हा दरवाढ होऊ लागली. बुधवारी सकाळी ५७,९०० रुपयांवर असलेले दर सायंकाळी ५८,२०० रुपयांपर्यंत वाढले. नवरात्रोत्सवात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ६० हजार रुपयांवर जाण्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तर चांदीचे दरही प्रतिकिलो ७५ हजार रुपयांची जाणार आहे. बुधवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचे दर ५८,२०० रुपये असून त्यावर ३ टक्के जीएसटी अर्थात १,७४६ रुपये आकारले असता दर ६० हजार रुपयांवर जातो.

चांदी ७५ हजार रुपयांवर जाणार
सोन्याच्या दराप्रमाणेच दरदिवशी चांदीचेही दर वाढतात. त्यानुसार बुधवार, ११ ऑक्टोबरला शुद्ध चांदीचे प्रतिकिलो दर जीएसटी वगळून प्रतिकिलो ७०,५०० रुपये आणि जीएसटीसह ७२,६१५ रुपयांवर गेले आहेत. हे दर काहीच दिवसात ७५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढली आहे. ही मागणी दसरा आणि दिवाळीत दुप्पट, तिपटीवर जाईल. काही महिन्याआधी चांदीचे निव्वळ दर ७८ हजारांवर पोहोचले होते. त्यानंतर दर खाली आले आणि आता पुन्हा हळूहळू वाढत आहेत.

२२ कॅरेटच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी
सराफा बाजारात २२ कॅरेटचे ८० टक्के दागिने विकले जातात. बहुतांश दागिने २२ कॅरेटमध्ये तयार केले जातात. २४ आणि २२ कॅरेट सोन्याच्या भावात नेहमीच २,९०० रुपयांचा फरक असतो. बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे भाव ५८,२०० तर २२ कॅरेटचे भाव ५५,३०० रुपये होते. या दरावर ३ टक्के जीएसटी आकारला जातो. तर दागिन्यांवर जीएसटीसह १० ते १८ टक्क्यांपर्यंत घडणावळ शुल्क आकारले जाते.

हॉलमार्कचे चिन्ह पाहूनच दागिने खरेदी करा
ग्राहकाने सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यात दागिन्यांची शुद्धता दिसून येते. यामध्ये याची हमी सरकार देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अ‍ॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सोन्याचे दर आकाशाला भिडणार
पितृपक्षात सोन्याचे बुकिंग करून नवरात्रात घरी नेण्याची प्रथा आता सुरू झाली आहे. उतरलेल्या भावात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले आहे. पुढे सोन्याचे दर आकाशाला भिडणार आहेत. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. - राजेश रोकडे, रोकडे ज्वेलर्स.

ग्राहकांची सोने खरेदी वाढली
यंदा पितृपक्षातही ग्राहकांची सोन्याची खरेदी वाढली आहे. ग्राहकांमध्ये खरेदीचा प्रचंड उत्साह आहे. ३ टक्के जीएसटीसह सोने आताच ६० हजार रुपयांवर गेले आहे. दरवाढ होण्याच्या शक्यतेने लोकांनी शोरूममध्ये आतापासून गर्दी केली आहे. - किशोरभाई सेठ, बटुकभाई अ‍ॅण्ड सन्स.

ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह
ग्राहकांमध्ये सोने-चांदी खरेदीचा प्रचंड उत्साह आहे. लोक लग्नाची खरेदी याच दिवसात करीत आहेत. नवरात्रात सोने घरी नेण्याची त्यांची तयारी आहे. युद्धामुळे सोन्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. भाव किती वाढतील, हे सांगणे कठीण आहे. - प्रदीप कोठारी, करण कोठारी ज्वेलर्स.

पहिल्यांदा दिसतेय पितृपक्षात खरेदी
सोने-चांदीची खरेदी पितृपक्षात पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. दरवाढीची शक्यता ओळखून ग्राहक शोरूममध्ये खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. हे व्यवसायासाठी चांगले संकेत आहेत. नवरात्र ते दिवाळी हे दिवस सराफांना दिलासा देणारे असेल. - पुरुषोत्तम कावळे, अध्यक्ष, नागपूर सराफा असोसिएशन.

Web Title: Gold and silver will shine more during Navratri festival 22 carat jewelery is the most sold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.