५०० रुपयांच्या दरवाढीसह सोने ६९ हजारांवर!
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 1, 2024 07:10 PM2024-04-01T19:10:41+5:302024-04-01T19:11:22+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आर्थिक घडामोडींमुळे देशांतर्गत सोन्याचे भाव दरदिवशी विक्रमी पातळीवर जात आहेत.
नागपूर: आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आर्थिक घडामोडींमुळे देशांतर्गत सोन्याचे भाव दरदिवशी विक्रमी पातळीवर जात आहेत. विदर्भाची सर्वात मोठी सराफा बाजारपेठ नागपुरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली आणि सायंकाळपर्यंत भाव ६९ हजारांवर पोहोचले. तीन टक्के जीएसटीसह भाव ७१,०७० रुपयांवर गेले आहेत. विक्रमी दरवाढीमुळे ग्राहक आवश्यक प्रसंगासाठीच सोने खरेदी करीत असल्याचे सराफा बाजारात दिसून येत आहे.
मार्च महिन्यात गुंतवणूकदारांना सोने खरेदीतून ८.५ टक्के परतावा मिळाला. त्यामुळे आता एप्रिल महिन्यात सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांनी सोने खरेदी वाढविल्याचे नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले. गुढीपाडव्यापर्यंत सोन्याचे दर जीएसटीविना ७० हजारांवर जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
सोमवारी सकाळच्या सत्रात शनिवारच्या ६८,५०० रुपयांच्या तुलनेत २४ कॅरेट शुद्ध सोन्याचे (९९.५) भाव ९०० रुपयांनी वाढून ६९,४०० रुपयांवर पोहोचले. मात्र दुपारच्या सत्रात भाव १०० रुपयांनी घसरले, तर सायंकाळच्या सत्रात पुन्हा ३०० रुपयांची घसरण झाली. त्यानंतर भावपातळी ६९ हजारांवर स्थिरावली. सोमवारी दिवसभरात सोन्याचे दर ५०० रुपयांनी वाढून ६९ हजारांवर पोहोचले. पुढे दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.