सोने ७१ हजाराच्या ऐतिहासिक उच्चांकावर !
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 6, 2024 07:29 PM2024-04-06T19:29:25+5:302024-04-06T19:34:40+5:30
- आठवड्यात २ हजारांची वाढ : चांदीचे भाव ८१,३०० रुपयांवर
नागपूर: सोने दरदिवशी ऐतिहासिक उच्चांक गाठत आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ७०० रुपयांची वाढ होऊन दहा ग्रॅम शुद्ध सोन्याची भावपातळी ७१ हजार रुपयांवर पोहोचली, तर तीन टक्के जीएसटीसह भाव ७३,१३० रुपयांवर गेली. आठवड्यात दहा ग्रॅममागे तब्बल २ हजार रुपयांची वाढ झाली. दरवाढीमुळे सोनेखरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
सोन्यासोबतच चांदीचे भावही दरदिवशी वाढतच आहेत. आठवड्यात प्रति किलो ५,४०० रुपयांची वाढ होऊन शनिवारी भाव ८१,३०० रुपयांवर पोहोचले. ३ टक्के जीएसटीसह ८३,७३९ रुपयांवर पोहोचले. दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरवाढीनंतर गुंतवणूकदारांची खरेदी वाढली आहे. अमेरिकेत सत्ता परिवर्तन आणि फेडरल बँकेने तीन टप्प्यात व्याजदर कमी करण्याचे दिलेले संकेत आणि जगातील सेंट्रल बँकांनी सोनेखरेदी वाढविल्याने भारतात सोन्याचे दर निरंतर वाढत असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. यापुढे दर कमी होणार नाहीत, पण किती वाढतील, हे आता सांगता येणार नाही, असे सराफा व्यापारी राजेश रोकडे यांनी सांगितले.