सोन्याच्या बिस्कीटाने पोहचवले पोलीस कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:55 PM2019-08-30T23:55:08+5:302019-08-30T23:56:16+5:30
धंतोलीच्या हॉटेलमध्ये थांबलेल्या तेलंगणामधील एका व्यक्तीजवळचे साडेनऊ लाखांचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेणा-या आरोपीला पोलीस कोठडीत जावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोलीच्या हॉटेलमध्ये थांबलेल्या तेलंगणामधील एका व्यक्तीजवळचे साडेनऊ लाखांचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेणा-या आरोपीला पोलीस कोठडीत जावे लागले. निखिल प्रमोद मेश्राम (वय ३०) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गडचिरोलीतील गोकुळनगर-आशीर्वादनगरात राहणारा निखिल गेल्या काही महिन्यांपासून धंतोलीतील अवध रेस्टॉरेंटमध्ये वेटरचे काम करायचा. बाजुलाच अवध हॉटेल आहे. तो हॉटेलमध्ये खाद्य पदार्थ देण्याच्या निमित्ताने येत होता. तेलंगणातील खम्मम येथील एसआरसी टॉवरमध्ये राहणारे अमदुगला पाटी व्यंकटरमन (वय ५६) हे ज्योतिषी असल्याचा दावा करतात. ते वास्तुशास्त्राबाबतही सल्ला देतात. या व्यवसायाच्या निमित्ताने महिन्यातील १५ दिवस ते नागपुरातच राहतात. यावेळी ते धंतोलीतील अवध हॉटेलच्या २१४ क्रमांकाच्या रुममध्ये मुक्कामी होते. त्यांनी त्यांच्या मालकीचा खम्मम येथील भूखंड काही दिवसांपूर्वी विकला आणि त्यातून आलेली रक्कम घेऊन ते नागपुरात आले होते. त्यांनी येथे २५९ ग्राम सोन्याचे तीन बिस्कीट (डल्ला) ९ लाख, ६० हजारांत विकत घेतले. ते त्यांनी आपल्या रूममध्ये बॅगमध्ये ठेवले होते. २५ ते २७ आॅगस्टच्या दरम्यान संधी साधून निखिलने हे सोने लंपास केले. बुधवारी सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर व्यंकटरमन यांनी आधी हॉटेल प्रशासनाकडे तक्रार केली. नंतर धंतोली ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार विजय आकोत यांनी लगेच आपल्या सहका-यांना चोरीच्या शोधकामी लावले. हॉटेलमध्ये येणारा निखिल नामक वेटर गायब असल्याचा धागा चौकशीत मिळताच पोलिसांनी त्याचा पत्ता काढला अन् गुरुवारी सकाळी गडचिरोली गाठली. तेथे निखिल मेश्रामला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेल्या २५९ ग्राम सोन्यापैकी २४६ ग्राम सोने जप्त केले. त्याला अटक करून नागपुरात आणण्यात आले. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करून त्याचा पोलिसांनी एक दिवसाचा पीसीआर मिळवला.
पोलीस आयुक्तांकडून प्रशंसा !
चोरलेल्या सोन्यापैकी १३ ग्राम सोने निखिलने त्याच्या एका मित्राकडे दिले. मला हे सोने सापडले. तुझ्याकडे ठेव, असे म्हणून निखिलने मित्राकडे सोने लपवून ठेवले. त्यामुळे पोलीस आता निखिलच्या त्या मित्राचा शोध घेत आहेत.
दरम्यान, तक्रार मिळताच अवघ्या काही तासात या चोरीचा छडा लावून चोरीचा ऐवज जप्त करण्याची कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, उपायुक्त विनिता साहू, सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली धंतोलीचे ठाणेदार विजय आकोत यांच्या नेतृत्वात एएसआय प्रेमचंद तिवारी, हवलदार आसिफ शेख, विरेंद्र गुळरांधे, राजेंद्र खंडाते, दिनेश घुगे, पंकज हेडावू, हेमराज बेराळ, प्रमोद सोनवणे आणि देवेंद्र बोंडे यांनी ही कामगिरी बजावली. या कामगिरीची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दखल घेत तपास पथकाचे कौतुक केले आहे.