सोन्याची विक्रमी उसळी; जीएसटीसह भाव ६९,२०० रुपये
By मोरेश्वर मानापुरे | Published: March 21, 2024 08:25 PM2024-03-21T20:25:46+5:302024-03-21T20:26:06+5:30
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम : २० दिवसात चार हजारांची झळाळी
मोरेश्वर मानापुरे, नागपूर : आता पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. देशांतर्गत जोरदार खरेदीमुळे नागपूर सराफा बाजारात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव तीन टक्के जीएसटीसह ६९,३०० रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान, सोन्याची सततची वाढ इथेच थांबणार नाही. लवकरच ७० हजाराचा आकडा गाठणार असल्याचे मार्केट विश्लेषकांचे म्हणणे आहे. भाववाढीमुळे लोक आवश्यक प्रसंगासाठी सोने खरेदी करीत आहेत.
सोन्याच्या दरात जगभरात अचानक तेजी आली आहे. मार्च महिन्यात सोन्यात कमालीची वाढ झाली आहे. तीन टक्के जीएसटीसह ४,१२० रुपयांनी वाढले. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर लग्नसराई आणि अन्य कारणांसाठी खरेदी करणाऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मार्च महिन्यात जीएसटीविना सोन्याच्या किमती पाहिल्यास १ मार्चला दर ६३,२०० रुपये, २ मार्चला ६३,९००, ५ मार्चला ६५,१००, ९ मार्चला ६५,९०० रुपये, त्यानंतर १८ मार्चपर्यंत सोन्याचे दर ६५,५०० ते ६५,७०० रुपयांदरम्यान होते.
१८ मार्च रोजी सकाळच्या सत्रातच सोन्याच्या किमतीने ६६ हजारांचा विक्रमी आकडा गाठला होता. हे भाव २० मार्चपर्यंत कायम होते. मात्र, २१ मार्च रोजी सकाळच्या सत्रात अचानक १,२०० रुपयांनी भाव वाढून ६७,२०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर दुपारी पुन्हा १०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ६७,३०० रुपयांवर पोहोचली. त्यानंतर १०० रुपयांची घसरण होऊन भाव पुन्हा ६७,२०० रुपयांपर्यंत उतरले. सोने ७० हजारांचा आकडा गाठणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज खरा होताना दिसत आहे.
दिनांक सोन्याचे दर (जीएसटीविना)
१ मार्च ६३,२००
२ मार्चला ६३,९००
५ मार्चला ६५,१००
९ मार्चला ६५,९००
१८ मार्च ६५,७००
१८ मार्च ६६,०००
२० मार्च ६६,०००
२१ मार्च ६७,२००